आता परवानगीशिवाय बिग बींचा आवाज, नाव, फोटो वापर...

आता परवानगीशिवाय बिग बींचा आवाज, नाव, फोटो वापरता येणार नाही, दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय (Amitabh Bachchan’s Name, Voice And Image Can’t Be Used Without His Permission: Delhi HC)

बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी दिल्लीतील हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. अनेक कंपन्या परवानगीशिवाय त्यांचं नाव, आवाज आणि चेहरा किंवा पर्सनॅलिटीचा वापर करतात. याच कारणामुळे त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. पब्लिसिटी आणि पर्सनॅलिटी राईट्ससाठी बिग बींनी हे पाऊल उचललं आहे. परवानगीशिवाय कोणीही त्यांचा आवाज, नाव किंवा ओळखीचा वापर करू नये, अशी मागणी त्यांनी या याचिकेतून केली. याप्रकरणी बिग बींना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.

न्यायमूर्ती चावला यांनी अथॉरिटी आणि टेलिकॉम डिपार्टमेंटसाठी आदेश जारी केले आहेत. सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेले अमिताभ बच्चन यांचे फोटो, नाव किंवा पर्सनॅलिटी ट्रेट्स त्वरित हटवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे टेलिकॉम सर्व्हिस प्रोवायडरकडून कोर्टाने अशा काही फोन नंबर्सची माहिती मागितली आहे जे बिग बींचं नाव किंवा त्यांच्या आवाजाचा अवैध वापर करत आहेत. कोर्टाने इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडरलाही अशा प्रकरणाशी संबंधित ऑनलाइन लिंक्स काढून टाकण्यास सांगितलं आहे.

काही कंपन्या अमिताभ बच्चन यांचं नाव, आवाज आणि पर्सनॅलिटीचा गैरवापर करत होती. याविरोधात बिग बींनी कोर्टात याचिका दाखल केली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अमिताभ बच्चन यांच्या नावाने एका लॉटरीची जाहिरातसुद्धा सुरू होती. प्रमोशनल बॅनरवर त्यांच्या परवानगीशिवाय फोटो लावले जात होते. इतकंच नव्हे तर KBC या शोचा लोगोसुद्धा त्यावर होता. लोकांची फसवणूक करण्यासाठी अशा पद्धतीने बॅनर बनवण्यात आला होता. यावरूनच बिग बींनी हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी अमिताभ बच्चन यांच्या बाजूने याचिका दाखल केली. बिग बींच्या पर्सनॅलिटी राइट्सचा गैरवापर केला जातोय, यामुळे त्यांची इमेज खराब होतेय, असं ते याचिकेत म्हणाले. बिग बींनी काही जाहिरात कंपन्यांवरही त्यांच्या प्रॉडक्टच्या प्रचारासाठी आपल्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.