अमिताभ बच्चन यांनी लग्नाआधीच जया बच्चन यांच्यास...

अमिताभ बच्चन यांनी लग्नाआधीच जया बच्चन यांच्यासमोर ही अट ठेवली होती, “मला ९ ते ५ नोकरी करणारी बायको नको.” (Amitabh Bachchan told Jaya Bachchan before their wedding he didn’t ‘want a wife who’ll work 9-5’: Work but not every day)

बॉलिवूडमधील अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी नेहमीच आदर्श जोडपं म्हणून प्रचलित राहिलेली आहे. लवकरच या उभयतांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही गोष्टी जाणून घेण्याची कायम उत्सुकता असते. अलीकडेच, जया बच्चन यांनी बिग बी आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित अशी काही रहस्ये त्यांची नात नव्या नवेली नंदा हिच्या पॉडकास्ट ‘व्हॉट द हेल नव्या’ मध्ये शेअर केली आहेत.

जया बच्चन यांनी लग्नाच्या ४९ वर्षांनंतर नव्या नवेली नंदा यांच्या पॉडकास्टमध्ये लग्नाआधीचा एक किस्साही सांगितला. नव्याच्या पॉडकास्टच्या नवीन एपिसोडचा विषय होता- ‘मॉडर्न लव्ह: रोमान्स अँड रेग्रेट्स’. पॉडकास्टमध्ये जेव्हा नव्याने जयाजींना त्यांच्या प्रेमकथेबद्दल विचारले तेव्हा त्यांनी अमितजींनी लग्नाआधी कशाप्रकारे त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती याचा किस्सा शेअर केला. त्या म्हणाल्या, “आम्ही ठरवले होते की ऑक्टोबरमध्ये लग्न करायचे. कारण तोपर्यंत माझे काम पूर्ण होणार होते, पण अमितजींनी मला सांगितले, मला ९ ते ५ काम करणारी बायको नको. तू काम कर, परंतु दररोज नाही.  तू तुझे प्रोजेक्ट निवड आणि योग्य लोकांसोबत काम कर.”

आणि हेच कारण होते की लग्नानंतरही बिग बी यशाची नवीन शिखरे चढत असताना, जयाजींनी त्यांची अट मान्य करून करिअर सोडले आणि सर्व लक्ष कुटुंबावर केंद्रित केले.

लग्नाचा निर्णय घाईत का घ्यावा लागला, याचाही खुलासा जया बच्चन यांनी केला आहे. “आम्ही ऑक्टोबर १९७३ मध्ये लग्न करणार होतो. तोपर्यंत मी माझ्या कामाच्या कमिटमेंट्स पूर्ण केल्या असत्या. जंजीर हिट झाला तर चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी सुट्टीवर जाऊ, असे आम्ही ठरवले होते. जंजीर हिट ठरला. आम्हाला सुट्टीवर जायचे होते. पण एक दिवस अमितजींचा फोन आला. एक प्रॉब्लेम आहे म्हणाले. माझे आई-बाबा तुझ्यासोबत सुट्टीवर जाण्याची परवानगी देत ​​नाहीत. सुट्टीवर जायचे असेल तर आधी लग्न करा, मग जा, असे त्यांचे म्हणणे आहे. मी म्हटलं ठीक आहे. ऑक्टोबरमध्ये आपण लग्न करणार होतो की नाही, आता करूया. तुम्हाला फक्त माझ्या आईवडिलांशी बोलावे लागेल. त्यांनी माझ्या वडिलांना बोलावले, जे फार आनंदी नव्हते कारण त्यांना मी लग्न करावे असे वाटत नव्हते, पण नंतर त्यांनीही होकार दिला. आणि अशा प्रकारे ३ जून १९७३ रोजी आमचे लग्न झाले.

नात नव्या नवेली नंदा आणि जया बच्चन यांच्यातील बॉन्डिंग खूप चांगले आहे. नुकतेच नव्याच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी अशी एक गोष्ट सांगितली होती, ज्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्या म्हणाल्या त्यांच्या वेळेचं प्रेम वेगळं होतं. आता प्रेमाच्या व्याख्या बदलत चाललेल्या आहेत. त्यामुळे नव्या नवेली नंदा लग्नाशिवाय आई झाली तरी तिला आमच्याकडून कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय जया यांनी नाते आणि प्रेमाबाबत अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, ज्या ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते.