लग्नाच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन ...

लग्नाच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांनी शेअर केला त्यांचा व जयाचा ठेवणीतला फोटो, चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा तर शहेनशहाने म्हटले ‘धन्यवाद’ (Amitabh Bachchan Shares Vintage Wedding Photo With Jaya On 49th Anniversary, Thanks Fans For Wishes)

बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन आज त्यांच्या लग्नाचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने अमिताभजींनी सोशल मीडियावर त्यांचा व पत्नी जया बच्चनचा एक ठेवणीतला फोटो शेअर केला. त्यांनी तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यापासून त्यांचा मित्रपरिवार,चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

 लग्नाच्या 49 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत अमिताभ यांनी त्यांच्या लग्नाच्या अल्बममधला एक फोटो शेअर केला. सोबतच एक स्वत:चा हात जोडून नमस्कार करतानाचा फोटो शेअर करत त्या फोटोला कॅप्शन दिले की, ” जया आणि माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही ज्याप्रकारे स्नेह आणि आदराचा वर्षाव करत आहात त्यासाठी मी तुमचे हात जोडून आभार मानतो. धन्यवाद! माझ्या आणि जयाच्या लग्नाच्या वाढदिवसाला तुमच्याकडून मिळालेल्या प्रेम आणि स्नेहासाठी मी तुम्हाला प्रणाम करतो. धन्यवाद ! प्रत्येकालाच उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे कृपया इथे माझे आभार स्विकार करा.

अमिताभ आणि जया बच्चन यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. ‘गुड्डी’ सिनेमाच्या सेटवर या दोघांच्या प्रेमाला पालवी फुटली होती. तो चित्रपट ह्रषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला होता. त्यानंतर अमिताभ व जया यांनी ‘एक नजर’ या चित्रपटात एकत्र काम केले. त्यानंतर दोघांनी 3 जून 1973 ला जवळच्या माणसांच्या उपस्थितीत लग्न केले. लग्नानंतर हे जोडपं  लगेच लंडनला फिरण्यासाठी गेले होते.