बिग बी अमिताभचा पिताजींच्या कवितेने करोनावर ‘प्...

बिग बी अमिताभचा पिताजींच्या कवितेने करोनावर ‘प्रहार’ : सोबत बाधितांच्या मदतीसाठी १५ कोटींच्या महादानाची यादी जाहीर केली (Amitabh Bachchan shares Details of 15 Cr Covid Relief Contribution, Recites Father’s Poem to Motivate People)

देशात करोना संक्रमणाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच सर्व स्तरातून अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. त्यातही बॉलिवूड कलाकारांकडून मिळालेल्या मदतीमुळे खूपच आधार मिळालेला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी करोनाग्रस्तांसाठी करोडो रुपयांचे योगदान दिले असून आता त्यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडिओ प्रदर्शित करून लोकांचे मनोधैर्य प्रबळ करण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ यांनी कविता सादर करत मनोधैर्य खचलेल्या लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

अमिताभ बच्चन यांनी या व्हिडिओमध्ये आपल्या वडिलांची हरिवंशराय बच्चन यांची बहुचर्चित कविता ‘रुके न तू.. थके न तू… म्हटली आहे. बिग बी अतिशय उत्कटतेने, ‘धनुष उठा प्रहार कर… तू सबसे पहला वार कर… अग्नि सी धधक-धधक… हिरण सी सजग-सजग… सिंह सी दहाड कर.. शंख सी पुकार कर… रुके न तू… थके न तू… झुके न तू… थमे न तू…’ ही कविता सादर करत आहेत. यानंतर अमिताभ बच्चन यांनी लिहिलंय, ‘ आम्ही लढणार आणि जिंकणार… आपण एकत्र येऊया’. आज देशाची परिस्थिती बिकट आहे, अशा वेळी आपण आपल्या कामगारांसोबत उभं राहिलं पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन या महामारीवर विजय मिळवायचा आहे. एवढंच नाही तर सगळ्यांनीच आपपल्या कुवतीप्रमाणे मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे, असे आवाहनही अमिताभजींनी केले आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमधून करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिलेल्या महादानाची यादी सादर केली आहे. ते सतत मदत करत आहेत. ”मी दिल्लीतील एका कोविड सेंटरला दिलेल्या २ करोड रुपयांबद्दल सगळ्यांना माहीत आहे. परंतु हळूहळू लोकांना माहीत होईल की मी जवळजवळ १५ कोटींचे योगदान दिलेले आहे,” असे त्यांनी आपल्या ब्लॉकमध्ये लिहिले आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

करोना संसर्गामुळे आई – वडिलांचे छत्र हरवलेल्या दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली असल्याचेही अमिताभ बच्चन यांनी स्पष्ट केले आहे. ही मुलं हैद्राबाद येथील अनाथाश्रमात असून त्यांना १० वी पर्यंत शिकवण्याची, इतकेच नाही तर जर त्यांना पुढे शिकायचे असेल तर त्यासाठीही मदत करण्याची आपली तयारी आहे,’ असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

अमिताभ बच्चन यांना अनेकदा युजर्सकडून, करोनाच्या लढ्यात तुम्ही काय मदत करता असा प्रश्न सातत्याने विचारला गेला. खरं तर याचं उत्तर न देता बिग बींनी मौन ठेवलं होतं. परंतु या ट्रोलर्सना उत्तर देण्यासाठी आपलं मौन सोडत त्यांनी ही माहिती दिली आहे. तसेच करोनाग्रस्तांना या आजाराविरुद्ध लढण्यासाठी बळ मिळावं म्हणून त्यांनी आपल्या वडिलांची कविता सादर केलेला व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. या कवितेच्या माध्यमातून लोकांच्या मनातील भितीवर प्रहार करण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यांचे हे कार्य एकप्रकारे योगदानच आहे.