राजू श्रीवास्तव यांच्यासाठी अमिताभ बच्चनने पाठव...

राजू श्रीवास्तव यांच्यासाठी अमिताभ बच्चनने पाठवली खास भेटवस्तू (Amitabh Bachchan Sends Such A Special Gift For Raju Shrivastava That Family Expects It Will Help In His Quick Recovery)

सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव सध्या जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करत आहेत.बुधवारी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून राजू यांची प्रकृती गंभीर आहे. ते सध्या व्हेंटिलेटरवर असून त्याचा मेंदू प्रतिसाद देत नाही आहे. राजू यांची तब्येत सुधारावी यासाठी त्यांचे अनेक चाहते तसेच सेलिब्रेटी प्रार्थना करत आहेत. अशातच खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांच्यासाठी एक खास भेटवस्तू पाठवली असून त्यांच्या या भेटवस्तूमुळे काहीतरी जादू होऊन ते बरे होतील अशी आशा त्यांच्या कुटुंबियांना आहे.

राजू यांना रुग्णालयात भरती केल्यापासून त्यांचा मेंदू कोणत्याच उपचाराला प्रतिसाद देत नाही. त्यांचा मेंदू कशाला प्रतिसाद देत नसला तरी ते सभोवतालचा आवाज ऐकू शकतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे जर त्यांनी त्यांच्या प्रिय व्यक्तीचा आवाज ऐकल्यास त्यांचा मेंदू पुन्हा सक्रिय होऊ शकतो. तसेच ते बरे होण्यास मदत होईल असे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी असे सांगताच त्यांच्या कुटुंबियांना अमिताभ बच्चनची आठवण झाली. राजू  बिग बींचे खूप मोठे चाहते आहेत. सुरुवातीच्या काळात तर ते त्यांची नक्कल करुनच लोकप्रिय झाले होते. त्यामुळे जर त्यांनी बिग बींचा आवाज ऐकला तर नक्कीच काहीतरी जादू होईल असा त्यांच्या कुटुंबियांचा विश्वास होता.

जेव्हा त्या संदर्भात त्यांनी बिग बींच्या ऑफिसमध्ये फोन लावला तेव्हा त्यांना समजले की, बिग बी स्वत: राजू यांच्या फोनवर मेसेज पाठवत आहेत. आतापर्यंत त्यांनी १० मेसेज तरी केले आहेत. पण कदाचित त्यांचा फोन बंद असल्याने ते मेसेज त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. त्यानंतर राजू यांच्या कुटुंबियांनी राजू यांचा फोन चालू केला तेव्हा त्यांना बिंग बींनी पाठवलेले मेसेज दिसले.

त्यानंतर राजू यांच्या कुटुंबियांनी बिग बींना व्हॉइस मेसेज पाठवण्याची विनंती केली. त्यावर लगेच बिग बींनी आपल्या अनोख्या अंदाजात राजूसाठी एक ऑडिओ मेसेज पाठवला, त्यात त्यांनी म्हटले की, राजू उठ, आता खूप झालं, अजून खूप काम करायचं आहे. तो ऑडिओ मेसेज त्यांनी राजू यांना ऐकवला आहे. पण त्यांच्या तब्येतीत अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही. पण बिग बींनी राजूसाठी जे केले ते खरचं कौतुकास्पद आहे.

राजू यांच्या तब्येतीत अजूनतरी कोणतीच सुधारणा झालेली नाही. डॉक्टरांची संपूर्ण टीम त्यांना बरे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.