अमिताभ बच्चनचे पुनरागमन : कौन बनेगा करोडपती पुन...

अमिताभ बच्चनचे पुनरागमन : कौन बनेगा करोडपती पुन्हा सुरू होणार (Amitabh Bachchan Returns With ‘Kaun Banega Crorepati 13’, Registration For New Season Starts)

महानायक अमिताभ बच्चनचे विलक्षण प्रभावी सूत्रसंचालन असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे पुन्हा प्रसारण सुरू होत आहे. करोना साथीच्या या काळात पैशांची चणचण भासत असताना या कार्यक्रमातून मिळणारे उत्पन्न ही गरजूंच्या हिशेबी वाळवंटातील हिरवळ ठरणार आहे. कारण या कार्यक्रमातून कित्येक लोकांना अमाप प्रसिद्धी व पैसा मिळालेला आहे. अशा या आशावादी कार्यक्रमाचा हा १३ वा सिझन असून त्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू होत आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सोनी टी. व्ही. ने या कार्यक्रमाची घोषणा करून १० मे पासून रजिस्ट्रेशन सुरू होत असल्याचे सांगितले. चॅनलने इन्स्टाग्राम हॅन्डल वर छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात आपल्या खास शैलीत अमिताभ बच्चन एन्ट्री करतो आणि रजिस्ट्रेशन करण्याचे लोकांना आवाहन करतो.

करोना साथीच्या काळात या कार्यक्रमाचा १२वा सिझन गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रसारित झाला होता. आता हा १३ वा सिझन ऑगस्टमध्ये प्रसारित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही या कार्यक्रमाची ऑडिशन्स डिजिटल माध्यमातून केली जाईल. कार्यक्रमात प्रवेश करण्यापूर्वी स्पर्धकाला रजिस्ट्रेशन प्रक्रियेतून जावे लागणार आहे. त्यासाठी १० मे पासून २ आठवडे, दररोज रात्री १० वाजता अमिताभ बच्चन एक प्रश्न विचारेल. त्याचे खरे उत्तर देणाऱ्याचे रजिस्ट्रेशन होईल. त्यानंतर स्क्रीनिंग, ऑनलाईन ऑडिशन असे टप्पे पार करत स्पर्धकाची अंतिम निवड होईल.