हास्यजत्राचे विनोदवीर भेटले अमिताभ बच्चनला : मह...
हास्यजत्राचे विनोदवीर भेटले अमिताभ बच्चनला : महानायकाने केले त्यांचे कौतुक (Amitabh Bachchan Has All Praise To Comedians Of ‘Maharashtrachi Hasyajatra’)

सगळ्यांची लाडकी आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी सोनी मराठी वाहिनीची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही अनेक मोठमोठ्या कलाकारांचीसुद्धा आवडती आहे आणि आता या कलाकारांच्या यादीत दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचं नाव जोडलं गेलं आहे. महाराष्ट्राच्या या लाडक्या हास्यकलाकारांनी नुकतेच फिल्मसिटी इथं जाऊन अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. या वेळी अमिताभजींनी सर्व हास्यवीरांचं आणि हास्यजत्रेचंही कौतुक केलं, ‘तुम्ही लोकांना हसवण्याचं अतिशय कठीण काम करताहात. ते असंच करत राहा’, असं ते म्हणाले. आपण स्वतःही हास्यजत्रा पाहत असल्याचं आणि आपल्या कुटुंबालाही हास्यजत्रेबद्दल सांगत असल्याचं त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं.

सर्वांची आवडती हास्यजत्रा ही रविवारी केल्यावर अनेक प्रेक्षकांनी ती पुन्हा चार दिवस व्हावी आणि हा हास्याचा डोस आठवड्यातून चार दिवस मिळावा, अशी मागणी केली होती. प्रेक्षकांच्या या मागणीचा मान राखून २० सप्टेंबरपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे वार आठवड्यातून चार करण्यात आले आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम आणि भरघोस प्रतिसाद मिळत आला आहे. समीर-विशाखा, प्रसाद-नम्रता, गौरव-वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी मिळून प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे.