अमिताभ बच्चनने मुंबईत घेतले आणखी एक घर : ते आहे...

अमिताभ बच्चनने मुंबईत घेतले आणखी एक घर : ते आहे १२ हजार चौरस फुटांचे (Amitabh Bachchan Again Bought 12000Sqft House In Mumbai, Big B Has Become The Owner Of Many Houses)

बिग बी अमिताभ बच्चनचं वय आज ७९ वर्षांचं असलं तरी त्याला चित्रसृष्टीत अद्याप चांगलीच मागणी आहे. त्यामुळे एकामागून एक चित्रपटांचे करार करत, त्याच्या संपत्तीत भर पडत आहे. गेल्याच वर्षी त्याने मुंबईच्या पॉश विभागात ३१ कोटी रुपये किंमतीचे घर खरेदी केले होते. तर हल्लीच त्याने मुंबईतील पॉश विभागात आणखी एक घर खरेदी केले आहे. संपूर्ण मजला त्याने घेतला आहे.

इ टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईतील चार बंगला परिसरात पार्थनॉन बिल्डींगमध्ये संपूर्ण ३१ वा मजला अमिताभने विकत घेतला आहे. या आलिशान घराचे क्षेत्रफळ १२ हजार चौरस फुटांचे आहे. त्यासाठी त्याने नेमके किती पैसे दिले, ते अद्याप कळलेले नाही. पण हा व्यवहार कोट्यावधी रुपयांचा असणार हे नक्की.

सध्या अमिताभ, आपल्या पूर्ण कुटुंबासह ‘जलसा’ या जुहू येथील बंगल्यात राहत आहेत. त्याआधी हे लोक प्रतिक्षा बंगल्यात राहत होते. अमिताभकडे भरपूर स्थावर व जंगम मालमत्ता आहे. त्याने जलसा बंगल्याच्या मागील भागात असलेला एक बंगला २०१३ साली विकत घेतला होता. त्याची किंमत ५० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे कळते.

त्याने आधी अंधेरीचे एक अपार्टमेन्ट अभिनेत्री क्रिती सेननला भाड्याने दिले होते. त्याचप्रमाणे एका बंगल्याचा तळमजला स्टेट बँकेस भाड्याने दिला आहे. यातून त्याला चांगले उत्पन्न मिळते.

गेल्या ५ दशकांपासून अमिताभ चित्रसृष्टीत काम करत आहे. पण जोडीला त्याने जाहिराती, रिॲलिटी शो मध्ये कामे करून चिक्कार माया कमावली आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपटात अमिताभ चमकला आहे. उंचाई, गणपत, घूमर असे ७ चित्रपट सध्या त्याच्या हातात आहेत.