अमिताभ – अक्षय – शाहरूख – सलम...

अमिताभ – अक्षय – शाहरूख – सलमान यांची पहिली कार कोणती होती? (Amitabh – Akshay To Shahrukh – Salman; Know About 10 Bollywood Star’s First Cars)

बॉलिवूडचे सितारे खूपच ऐषारामी जीवन जगतात. शानदार बंगले, महागडे कपडे, हिरेजडीत दागिने, अपार्टमेंट, पेन्ट हाऊस, फार्म हाऊस आणि बीएमडब्लू ते मर्सिडीज्‌ आणि फरारी ते लॅम्बॉर्गिनी अशा महागड्या कार्स आज त्यांच्याकडे आहेत. पण कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांच्याकडे स्वस्त किंवा सेकंड हॅन्ड कार्स होत्या. या कार्स नेमक्या कोणाकडे होत्या? किंवा बॉलिवूड स्टार्सकडे त्यांची पहिली कार कोणती होती, ते पाहूया.

अमिताभ बच्चन

बिग बी अमिताभ बच्चनकडे आज जगातील सर्वात महागड्या कार्स आहेत. परंतु त्याने स्वतःसाठी घेतलेली पहिली कार फियाट होती. चित्रसृष्टीत पदार्पण करून सुरुवातीला, त्याला जे पैसे मिळाले होते, त्यामधून त्याने ही फियाट गाडी घेतली होती. विशेष म्हणजे ही मोटारगाडी त्याने सेकंड हॅन्ड घेतली होती. जी कलकत्ता येथून त्याने खरेदी केली होती. कारण तिकडे ती, मुंबईपेक्षा स्वस्त मिळत होती.

शाहरूख खान

शाहरूख खानकडे आज बीएमडब्लू पासून ते ऑडी अशा महाग ब्रॅन्डच्या मोटार कार्स आहेत. इतकेच नव्हे तर बुगाती वेरॉन ही अती महाग कार ताब्यात असलेला तो एकमेव सेलेब स्टार आहे. परंतु त्याची पहिली मोटारगाडी होती ओमनी. ही ओमनी त्याला, त्याच्या आईने गिफ्ट दिली होती.

अक्षयकुमार

अक्षयकुमारकडे देखील आजमितीला अनेक आलिशान कार्स आहेत. परंतु त्याची पहिली कार फियाट होती. ही कार त्याने बरीच वर्षे वापरली. अन्‌ अजूनही सांभाळून ठेवली आहे. ही कार जेव्हा अक्षयने विकत घेतली होती, तेव्हा तिच्यात बसून तो शिरडीला साईबाबांच्या दर्शनाला गेला होता.

सलमान खान

सलमानकडे सध्या लॅन्ड रोव्हर, रेंज रोव्हर इवॉक, ऑडी आर ८, बीएमडब्लू एक्स ६; अशा सर्वच महागड्या मोटारगाड्या आहेत. पण त्याने पहिली गाडी सेकंड हॅन्ड घेतली होती. ती हेराल्ड गाडी होती. १९८५ मध्ये आलेल्या एका चित्रपटात ती ऋषी कपूर वापरताना दाखवलं होतं. या सिनेमाची कथा, सलमानचे पिताजी सलीम खान यांनी लिहिली होती. चित्रपट पूर्ण झाल्यावर सलमानने ती विकत घेतली.

दीपिका पादुकोण

दीपिकापाशी पण सध्या बऱ्याच लक्झरी मोटारगाड्या आहेत. पण तिनं घेतलेली पहिली गाडी होती ऑडी क्यू ७. बरीच वर्षे दीपिका ही गाडी, जवळपास दररोज वापरत होती.

काजोल

मारुती सुझुकी १००० ही काजोलची पहिली कार होती. मोठ्या कौतुकाने तिने या कारचे फोटो प्रसिद्ध केले होते. अन्‌ हे आपलं पहिलं प्रेम असल्याचं तिनं सांगितलं होतं.

कतरीना कैफ

लॅन्ड रोव्हर, रेंज रोव्हर वोग, मर्सिडीज एमएल ३५० अशा आलिशान गाड्यांची कतरीना कैफ आज मालकीण आहे. मात्र तिने खरेदी केलेली पहिली मोटारगाडी ऑडी क्यू ७ होती. या गाडीबद्दल तिला अजूनही खूप प्रेम वाटतं.

आलिया भट्ट

आलिया भट्टने २०१५ साली ग्रे रंगाची ऑडी ए ६ ही गाडी खरेदी केली होती. ही तिची पहिली कार होती. आज तिच्याकडे बीएमडब्लू ७ सिरीज्‌, ऑडी क्यू ७ आणि लॅन्ड रोव्हर व रेंज रोव्हर वोग अशा महागड्या कार्स आहेत.

सारा अली खान

साराने आपली पहिली कार घेतली होती, ती होंडा सी आर होती. ही कार ती रोज वापरत असे. आता तिने जीप कंपास ही कार घेतली आहे. आजकाल ती या जीपचा वापर करते.

कंगना रणौत

काही ना काही मुद्यावरून सदैव वाद उकरून काढणारी कंगना रणौतकडे अनेक महागड्या मोटारगाड्या आहेत. अन्‌ तिचे राहणीमान श्रींमतीचं आहे. पण तिने आपली पहिली कार घेतली होती बीएमडब्लू ७ सिरीज्‌ सेदान. ही कार तिने बरीच वर्षे वापरली.