कडक शिस्तीचा वकील म्हणून अमित भानुशालीचे ९ वर्ष...

कडक शिस्तीचा वकील म्हणून अमित भानुशालीचे ९ वर्षांनी मालिकेत पुनरागमन (Amit Bhanushali Makes A Come Back In Serial After 9 Years : Will Play The Role Of Disciplined Lawyer)

स्टार प्रवाहवर ५ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असून रडायचं नाही तर लढायचं असं ठामपणे सांगणारी सायली लवकरच मनोरंजनाच्या प्रवाहात सामील होणार आहे. या नव्या मालिकेत सायली इतकीच एक महत्त्वाची व्यक्तिरेखा असेल आणि ती म्हणजे अर्जुन सुभेदार. अभिनेता अमित भानुशाली ही व्यक्तिरेखा साकारणार असून तब्बल ९ वर्षांनंतर अमित मराठी मालिका विश्वात दमदार कमबॅक करणार आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेतील या भूमिकेविषयी सांगताना अमित म्हणाला, ‘ही भूमिका साकारण्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागतेय. आता पर्यंत मी रोमॅण्टिक हिरोची भूमिका साकारली आहे. या मालिकेतील पात्र आजवर साकारलेल्या भूमिकांच्या पूर्णपणे वेगळं आहे. अर्जुन एक नामांकित वकील आहे. खूप कमी बोलणारा आणि कडक शिस्तीचा. एक अभिनेता म्हणून ही व्यक्तिरेखा साकारताना माझी कसोटी लागतेय. आमचे दिग्दर्शक सचिन गोखले मला हे पात्र उभं करण्यासाठी खूप मदत करत आहेत. स्टार प्रवाहसोबत मी मन उधाण वाऱ्याचे ही मालिका केली होती. पुन्हा एकदा या लाडक्या वाहिनीसोबत काम करताना प्रचंड आनंद होत आहे.

आमच्या निर्मात्या म्हणजेच सुचित्रा बांदेकर यांच्यासोबत मी एक हिंदी मालिकेत काम केलं होतं. सुचित्रा ताई सहकलाकार म्हणून उत्तम आहेतच पण निर्माती म्हणूनही त्यांच्यासोबत काम करताना धमाल येतेय. आमच्या सेटवर खूपच खेळीमेळीचं वातावरण असतं. शूट संपल्यानंतरही घरी जायची इच्छा होत नाही. सहकलाकारांसोबत छान मैत्री झाली आहे. मुळात आमच्या सेटवर प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे त्यामुळेच सीन करताना मजा येते. पडद्यामागचा हा घट्ट बंध प्रेक्षकांना मालिका बघतानाही जाणवेल.