घटस्फोटाच्या अफवांच्या दरम्यान निक जोनासच्या पो...

घटस्फोटाच्या अफवांच्या दरम्यान निक जोनासच्या पोस्टवर प्रियंकाची अतिशय रोमँटिक प्रतिक्रिया (Amid Separation Rumours, Priyanka Chopra Writes Lovestruck Comment On Nick Jonas Post)

प्रियंका आणि निक जोनासचं २०१८ साली मोठ्या थाटामाटात राजस्थानमधील जोधपूर येथील शाही राजवाड्यात हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनं लग्न झालं होतं. त्यावेळेस दोहोंमधील वयाचे अंतर आणि संस्कृतीमधील तफावत पाहता हे लग्न फार दिवस टिकणार नाही, असे भविष्य अनेकांनी वर्तविलं होतं. परंतु गेल्या तीन वर्षांत दोघांनी लोकांचं हे म्हणणं खोटं ठरवलं आणि आपलं प्रेम खरं असल्याचं दाखवून दिलं. याच वर्षी प्रियंका आणि निकने त्यांच्या नवीन घरामध्ये दिवाळी साजरी केली. दिवाळीतील त्यांचा रोमँटिक व्हिडिओही व्हायरल झाला होता. परंतु अचानक प्रियंकाने घेतलेल्या एका निर्णयामुळे तिचे चाहते संभ्रमात पडलेत. प्रियंकाने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन जोनास हे तिचे सासरचे आडनाव अचानक वगळले.

प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरुन जोनास हे नाव वगळून आता केवळ प्रियंका एवढंच नाव ठेवलं आहे. प्रियंकाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे तिच्यात आणि तिच्या पतीदरम्यान म्हणजेच अभिनेता, गायक निक जोनास दरम्यानचे संबंध बिघडल्याच्या अफवा उठल्या. दोघांमध्ये काय बिनसलं असेल असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले.

बरं प्रियंकानेही अचानक सासरचं आडनाव का वगळलं याबद्दल कोणतीही पोस्ट केली नाही. दरम्यान प्रियंकाच्या आईने मात्र यासंदर्भात न्यूज १८ डॉट कॉमशी बोलताना, प्रियंका आणि निकच्या नात्यात दुरावा आल्याच्या अफवा फेटाळून लावल्या. तसेच “या चर्चा अर्थहीन आहेत, अफवा पसरवू नका,” असंही मधू चोप्रा म्हणाल्या.

एवढं सगळं झाल्यानंतर आत्तापर्यंत गप्प राहिलेल्या प्रियंकाने पती निकच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओवर अशी काही कमेंट दिली आहे की, त्यामुळे अफवा पसरवणाऱ्यांची बोलतीच बंद झाली आहे. काही वेळापूर्वी निक जोनासने त्याच्या इन्स्टाग्रामवर तो वर्कआउट करत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर प्रियंकाने रोमँटिक होत लिहिले आहे की, “गजब! मला तुझ्या कुशीत मरायचे आहे.” यासोबतच तिने डोळ्यात प्रेम दर्शविणारे आणि हृदयाचे इमोजीही पाठवले आहेत. प्रियांका चोप्राच्या या कमेंटवरून अंदाज लावला जाऊ शकतो की तिचे निकवर किती प्रेम आहे आणि तिला आयुष्यातील प्रत्येक क्षण त्याच्यासोबत घालवायचा आहे.

प्रियांकाच्या या कमेंटमुळे तिच्या चाहत्यांना हायसे वाटले आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्रीच्या आयुष्यात सर्व काही ठीक चालले आहे, याची त्यांना खात्री पटली आहे. प्रियांकाच्या या कमेंटवर ते लाईक आणि कमेंट करून आनंद व्यक्त करत आहेत.