मक्याच्या कणसाचे चमत्कारी तंतू (Amazing Benefit...

मक्याच्या कणसाचे चमत्कारी तंतू (Amazing Benefits Of Corn Silk)

पावसाचे दिवस आहेत. या मौसमात मक्याचे कणीस अर्थात्‌ भुट्टा विपुल प्रमाणात येतो. पावसांच्या धारांमध्ये भाजलेले कणीस खाण्याची मौज काही वेगळीच आहे. जवळपास प्रत्येक जण ह्या कणसाची चव घेतोच. या कणसाला जे मुलायम तंतू असतात, ते आपण उपटून फेकून देतो… इथून पुढे असं करू नका. कारण या तंतूंचे, अर्थात्‌ कणसाच्या शेंड्याला असणाऱ्या केसांचे फारच औषधी उपयोग असल्याचे ध्यानात आले आहे. एरव्ही निरुपयोगी वाटणाऱ्या या तंतूंमध्ये चमत्कारी गुण दिसून आले आहेत. त्यांना इंग्रजीत कॉर्न सिल्क असे म्हणतात.

या तंतूचा चहा करून प्या म्हणजे त्याला आपण काढा असे म्हणू शकतो. याच्या सेवनाने आपल्याला पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी २, सी आणि के मिळतात.

या तंतूमय चहाने प्रोस्टेट ग्लॅन्डस्‌, सोरायसिस (त्वचा रोग) असे आजार पळाल्याची उदाहरणे आहेत. शिवाय शरीरात साठून राहिलेले पाणी बाहेर टाकण्याचे सामर्थ्य त्यात आहे. शरीरात पाणी साठून राहिले तर अंगाला सूज येते, वजन वाढते आणि हृदयाची क्रिया मंदावते. विशेषतः उतारवयात ही व्याधी जडते. या व्याधीपासून सदर कॉर्न सिल्कच्या चहाने मुक्ती मिळते.

या अद्‌भूत चहाने मूत्रविसर्जनास गती येते. त्यामुळे साहजिकच किडनी स्टोन किंवा किडनीचे अन्य विकार होत नाहीत. या तंतूमय चहाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. म्हणजेच मधुमेह असणाऱ्यांना तो अत्यंत उपयुक्त आहे. इन्सुलीनची निर्मित करण्यास हा काढा पोषक आहे.

चहा बनविण्याची कृती :

आपण चहाचे आंधण ठेवतो, तसे पाणी गरम करायला ठेवा. पाण्याला उकळी आली की, त्यामध्ये कणसाचे तंतू टाका. हा काढा चांगला उकळू द्या. आता चहाप्रमाणेच गाळणीने गाळून घ्या. या चहाचा रंग कोऱ्या चहासारखा दिसेल. त्यामध्ये चवीसाठी थोडासा लिंबाचा रस आणि मध घाला. नाही घातलं तरी चालेल. आणि असा हा गुणकारी चहा सकाळ-संध्याकाळ प्या. पावसाळी हवेत तीनदा घेतला तरी चालेल.