हिमालयाशी स्पर्धा करणारे पहाड – आल्पस (Al...

हिमालयाशी स्पर्धा करणारे पहाड – आल्पस (Alps mountains are competitors to Himalayas)

वृक्ष डेरेदार असतात, असू शकतात हे प्रथमच जाणवलं. पहाड इतके उंच की, आपल्या हिमालयाशी स्पर्धा करणारे. चिनारासारखे वृक्ष, खालपासून वरपर्यंत घनदाट, विविध रंगाचे, भरल्या अंगाचे.

युरोपच्या टुरचे दहा दिवस म्हणजे नेत्रसुखाची पर्वणी. मन प्रसन्न होण्याचा काळ. टूरमधील बराच काळ बसमधून प्रवास. ओघानं कंट्री साईड किंवा गावाबाहेरचा परिसर पाहायला मिळायचा. आल्पस म्हणजे उंचधिप्पाड पहाड. कुठे शुभ्रपांढरी, कधी जांभळी तर कधी गर्द वनश्रीने डंवरलेली त्याची शिखरे. काही बर्फाचे फेटे गुंडाळून बसलेली. त्यांच्या अंगाखांद्यावरून पाझरणारे बर्फगार पाणी, सर्वत्र खळाळत जाणारे झरे आणि बागडत जाणार्‍या नद्या. वृक्ष डेरेदार असतात, असू शकतात हे प्रथमच जाणवलं. पहाड इतके उंच की आपल्या हिमालयाशी स्पर्धा करणारे. चिनारासारखे वृक्ष, खालपासून वरपर्यंत घनदाट, विविध रंगाचे, भरल्या अंगाचे.
युरोपमधील जंगले इतकी दाट आहेत की आपल्या जंगलांना ‘जंगल’ म्हणायचा संकोच वाटावा. बहुतेक जंगले खाजगी मालकीची. त्यामुळे उत्तम जोपासलेली. मैलोनमैल कुंपण बांधून सुरक्षित ठेवलेली. जिथे पठार असेल तिथे हिरवेगार गवत लावलेले. त्याची सुरेख मशागत केलेली. जनावरांना चारण्यासाठी ठेवलेली कुरणे वेगळी. त्यात चरणार्‍या धष्टपुष्ट गायी. काही गवत खाऊन, तृप्त होऊन गवतातच विसावलेल्या. त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा मधुर नाद, दूरवर ऐकू येणारा. एकदम गोकुळाची आठवण आली. असाच असेल तिथला देखावा. फक्त कृष्णाच्या मुरलीची काय ती उणीव होती.

विकासाला प्राधान्य
त्या देशात वन राखण्याचे आपल्यासारखे निर्दयी व कठोर कायदे असतील असे वाटले नाही. विकासाला प्राधान्य दिलेले दिसले. डोंगरमाथ्यावर, उंचावरसुद्धा भक्कम रस्ते आहेत. केबल कार सर्वत्र चालताना दिसल्या.
जंगलातील परिपक्व झाडांची लाकडे तोडून त्यांच्या मोळ्या बांधलेल्या. लाकडाचे मोजके कारखाने-भर जंगलात. ‘कुठेच जंगल वाचवा’ असा गाजावाजा नाही. पण तरीही ती जंगले आपल्यापेक्षा सुदृढ, घनदाट आणि मोहून टाकणारी. निसर्ग आणि मानव दोघेही परस्परांच्या साहाय्याने मोकळा श्‍वास घेणारे. तिथल्या माणसांना पर्यावरणाचे भान आहे. पर्यटनाचेही. दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. पण कुठेही घाण नाही, वेडेवाकडे बांधकाम नाही, निसर्गावर अत्याचार नाही. जंगलाच्या आसपास प्राणिसंग्रहालये आहेत. तीही खाजगी मालकीची. पर्यटन व पर्यावरणाचा तोल सांभाळत, तिथे असलेली, विचारपूर्वक आखलेली व्यवस्था.
आपल्याकडे थुंकणारी, रस्त्यात कचरा फेकणारी माणसे, तिथे जाऊन शहाण्यासारखी वागतात कशी? केवळ कायद्याच्या भीतीने की तिथे गेल्यावर तिथल्यासारखीच होऊन जातात?

कैलासाचा भास
माऊंट टिटलिसवर तर कैलास पर्वताचा भास होतो. बर्फाची गुहा, बर्फाच्छादित शिखरे आणि एक प्रकारची आध्यात्मिक शांतता! उगाच वाटलं, तिथे शिवशंकराचं आणि पार्वतीचं अस्तित्व असावं. त्यांच्या तांडवनृत्याची जागाही मी शोधून काढली. मग मला लक्षात आलं हा आपला देश नाही. नाही कसा? शेवटी देशांच्या सीमा आपण ठरवल्या, होय ना? मग वाटलं, आपला देशही असाच सुजलाम सुफलाम आहे. ईश्‍वरानं सौभाग्य वाटताना आपल्यावर जराही अन्याय केलेला नाही. फरक आहे तो दिलेल्या भाग्याचा आणि वस्तूंचा सांभाळ करण्यामध्ये. शिस्त व स्वच्छता पाळण्यामध्ये. नेमकं तेवढंच आपल्याला जमत नाही. आपण युरोपमध्ये जाऊन येतो आणि तिथले गोडवे गातो. आपल्या देशाला तिथल्यासारखंच संपन्न करायचं आपल्याला सुचत नाही!
आपल्याही नद्या सागरासारख्या आहेत. त्यांच्या नद्यांपेक्षा अधिक विस्तृत आणि महान. पण आपली संस्कृती सांभाळ करण्याची नाही, निसर्गावर बलात्कार करण्याची आहे. म्हणूनच युरोपला जाऊन आल्यावर उदासही वाटतं. विमानातून परतीच्या प्रवासात भव्य आल्पस पुन्हा एकदा दिसला.

आपला उंच माथा उंचावून तो माझा निरोप घेत असल्याचा भास झाला. थोडे पुढे आलो तर वालुकामय प्रदेश आणि उघडे नागडे पहाड पाहायला मिळाले. ‘सहारा’ म्हणतात तसं वाळवंट. त्यावर एक झाड नव्हतं, तरीही तो प्रदेश सुंदर दिसत होता, असं वाटलं हेही ईश्‍वराचं दुसरं रूपच.
समाधिस्त असलेल्या त्या पहाडांना मी साद घातली नाही. त्यांच्या नुसत्या दर्शनानं मी मंत्रमुग्ध झालो होतो. दुरूनच त्यांना मी प्रणाम केला. चांगदेवासारखे वयोवृद्ध पहाड, मिटल्या डोळ्यांनीच माझ्याशी बोलले. बोलले बुद्धाची भाषा, बोलले विश्‍वप्रेमाची भाषा.