रमेश देव यांना मान्यवरांची श्रद्धांजली (All Rou...

रमेश देव यांना मान्यवरांची श्रद्धांजली (All Rounder Actor Ramesh Deo Passes Away : Celebrities Pay Homage To Him)

मराठी, हिंदी चित्रपट, मराठी नाटक आणि दूरदर्शन मालिका ते जाहिरातपट; अशा मनोरंजनाच्या सर्व माध्यमातून अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेता रमेश देव यांचे काल रात्री निधन झाले. या सर्व माध्यमातून नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्र अभिनेता म्हणून रमेश देव यांची कारकीर्द गाजली. ‘आपल्या सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा, मनस्वी अभिनेता आपण गमावला आहे’, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

पाटलाची पोर या मराठी चित्रपटातून रमेश देव यांनी पदार्पण केले. पुढे जगाच्या पाठीवर, देवघर, उमज पडेल तर, भिंगरी, सुवासिनी, एक धागा सुखाचा, माहेरची साडी अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी विविधरंगी भूमिका करून आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला. ‘मराठी मनोरंजन विश्वात होऊन गेलेल्या काही देखण्या नटांपैकी एक म्हणजे रमेश देव. अत्यंत उमदा माणूस’, असे ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी म्हटलं आहे.

राजबिंडा नायक ते खलनायक अशा विविधांगी व्यक्तीरेखा त्यांनी २८५ हिंदी तर १९० मराठी चित्रपटातून साकार केल्या. आरती या हिंदी चित्रपटातून रमेश देव यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. आणि तीन बहुरानियां, दस लाख, आदमी सडक का ते आनंद अशा हिंदी चित्रपटात ते आले. हिंदीत ते जास्त करून क्रूरकर्मा खलनायक म्हणून गाजले. तरी ‘आनंद’ चित्रपटातील डॉ. भास्कर ही त्यांची हृदयस्पर्शी भूमिका संस्मरणीय ठरली आहे. ‘प्रत्येक काम करताना त्यांच्यात उत्साहाचा झरा वाहत राहायचा. वेळेवर येणे, संवाद चोख पाठ असणे, असे कितीतरी गुण आम्ही त्यांच्याकडून आत्मसात केले आहेत,’ अशी भावांजली, अभिनेत्री अलका कुबल यांनी वाहिली आहे.

‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातून रमेश देव – सीमा ही जोडी जमली. पुढे त्यांचा विवाह झाला. मात्र त्यानंतर ही जोडी म्हणजे चित्रपटाच्या यशाची खात्री, असे समीकरण जुळले. एखाद दुसरा अपवाद वगळता सीमा देव यांनी फक्त रमेश यांच्यासोबतच काम केले.

चित्रसृष्टीच्या ग्लॅमरस्‌, झगमगीत दुनियेत राहून रमेश देव निर्व्यसनी राहिले. हा त्यांचा संयम सर्वांना कौतुकास्पद वाटत होता. ‘कोणत्याही व्यसनाशिवाय मनोरंजनसृष्टीत काम करणे, हा त्यांनी घालून दिलेला सर्वात मोठा आदर्श म्हणता येईल. त्यांचे काम पाहत आम्ही मोठे झालो…’ असे उद्‌गार ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले यांनी काढले आहेत.

तुझे आहे तुजपाशी, लग्नाची बेडी, लाल बंगली, मवाली ही रमेश देव यांनी काम केलेली नाटके होत. त्यांची लोकप्रियता इतकी होती की, नाटक संपल्यावर त्यांना पाहण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी नाट्यगृहाबाहेर प्रेक्षक उभे राहत.

‘माझ्यासाठी ही अत्यंत दुःखाची बातमी आहे. हे मनोरंजन सृष्टीचे नुकसान आहे,’ असे भावोद्‌गार अभिनेता अशोक सराफ यांनी काढले आहेत. या सुखांनो या, सर्जा, वासुदेव बळवंत फडके अशा काही चित्रपटांची निर्मिती रमेश देव यांनी केली होती. काही मराठी चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.