उर्मिला व आदिनाथ कोठारे यांच्यात सारे काही आलबे...

उर्मिला व आदिनाथ कोठारे यांच्यात सारे काही आलबेल (All Is Well Between Urmila And Adinath Kothare)

मध्यंतरीच्या काळात अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्यात काहीतरी बिनसले असल्याच्या बातम्या सर्वत्र फिरत होत्या. आदिनाथ आणि अमृता खानविलकरचा चंद्रमुखी काही दिवसांपू्र्वीच प्रदर्शित झाला. सर्व कलाकारांनी या चित्रपटाच्या अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या मात्र उर्मिलाने अदिनाथची पत्नी असूनही एकही पोस्ट शेअर केली नाही यामुळे सर्वांचा संशय आणखीनच बळावला होता.

पुढे उर्मिला कोठारेने १२ वर्षांनंतर स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून पुनरागमन केले होते. त्यावेळीही अनेक कलाकार मंडळींनी उर्मिलाला शुभेच्छा दिल्या मात्र आदिनाथकडून कोणत्याही प्रकारची पोस्ट शेअर झाली नव्हती. याशिवाय उर्मिलाने स्वत:च्या घरचे प्रोडक्शन हाऊस असून देखील पुनरागनासाठी दुसरे प्रोडक्शन हाऊस का निवडले असेल असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिला होता. त्यामुळे आदिनाथ आणि उर्मिला वेगळे होणार असल्याची चर्चा सुरु होती.

मात्र आता या चर्चांना पूर्णविराम बसला आहे.  ४ ऑगस्टला उर्मिलाचा डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित एकदा काय झाले या चित्रपटाचा ग्रॅण्ड प्रिमियर शो पार पडला. यावेळी उर्मिलाचे संपूर्ण कोठारे कुटुंब उपस्थित होते.

चित्रपट पाहिल्यानंतर कलाकारांनी या चित्रपटाबाबतचे मत व्यक्त केले. त्यावेळी उर्मिलाचे सासरे अभिनेता दिग्दर्शक महेश कोठारे आणि नवरा आदिनाथ कोठारे यांनी उर्मिलाचं तोंडभरुन कौतुक केलं. महेश कोठारे यांनी उर्मिलाच्या कामासोबतच डॉ. सलील कुलकर्णींच्या दिग्दर्शनाचेही कौतुक केले.

आदिनाथ कोठारेचे मुलाखत देताना अश्रू अनावर झालेले पहायला मिळाले. त्याने मुलाखतीत म्हटले की, सलील कुलकर्णींनी फारच अप्रतिम सिनेमा बनवला आहे. उर्मिलाचा अभिनय फारच कमाल होता. मला तिचा खूप जास्त अभिमान वाटतो. खरंतर गरोदरपणानंतर तिचे या चित्रपटात दमदार पुनरागमन झाले असे मी म्हणीन. तिने तिचे काम चोख बजावले आहे. आणि फार उत्तम काम केले आहे. सुमित नेहमीच कमाल काम करतो. शंकर महादेवनचा मी फार मोठा चाहता आहे. त्यांनी या चित्रपटासाठी खूप सुंदर गाणी गायली आहेत. हा चित्रपट म्हणजे नितळ आणि मनाला भिडणारी गोष्ट आहे. सगळ्यांनीच हा चित्रपट पहावा अशी माझी विनंती आहे.

एकदा काय झाले या चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्यास हा चित्रपट डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केला असून त्यात उर्मिला कोठारे, सुमित राघवन, मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, अर्जुन पूर्णपात्रे हे कलाकार आहेत. या चित्रपटाच्या ग्रॅण्ड प्रिमियरला मराठीतील दिग्गज कलाकारांसोबतच बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर , शिबानी दांडेकर , जावेद अख्तर यांनीही उपस्थिती लावली होती.