अखेर आलिया आणि रणबीरच्या मुलीचं बारसं झालं… आजी...

अखेर आलिया आणि रणबीरच्या मुलीचं बारसं झालं… आजीनं ठेवलं आपल्या नातीचं नाव (Alia Bhatt’s Big Reveal: Daughter’s Name Is Raha, Chosen By Neetu Kapoor)

आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या घरी काही दिवसांपूर्वीच चिमुकलीचं आगमन झालं. या लहान बाळाच्या जन्मापासूनच चाहत्यांमध्ये बाळाच्या नावावरून उत्सुकता होती. अखेर आलियाने आपल्या मुलीचं नाव सांगत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आलिया-रणबीरने त्यांच्या मुलीचे नाव राहा (Raha) असे ठेवले आहे. हे नाव आजी नीतू कपूरच्या पसंतीने ठेवण्यात आले आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी आपल्या मुलीच्या नावासोबतच नावाचा अर्थही सांगितला आहे.    

आलियानं एक पुसटसा फोटो शेअर केलाय, ज्यात रणबीर आणि तिच्यासोबत त्यांची मुलगी देखील आहे. तसेच, या फोटोमध्ये राहाच्या नावाची जर्सी भिंतीवर दिसत आहे. हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत आलिया भट्टने एक गोंडस कॅप्शनदेखील लिहिली आहे.

आलियाने सांगितलं आहे की, “नाव ‘राहा’ आहे, जे तिच्या आजीनं अगदी निवडून ठेवलं आहे. ज्याचे खूप अर्थ आहेत. राहाचा अर्थ दिव्य, आनंद, संस्कृतमध्ये कुळ, वंश, कुटुंब असा आहे. बंगाली भाषेत आराम, निवांत, विश्रांती असा होतो. अरेबिक मध्ये शांती आणि या व्यतिरिक्त स्वातंत्र्य आणि कल्याण असा देखील याचा अर्थ होतो.” अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये आलियाने राहा नावाचा अर्थ सांगितला आहे. शिवाय अगदी तिच्या नावासारखं आम्ही पहिल्या क्षणापासून हे सगळं अनुभवतोय, असेही तिने म्हटले आहे.

यासोबतच आलियानं लिहिलं आहे की, ”राहा, आम्ही तुझे आभारी आहोत. आमच्या कुटुंबात तू आनंद आणला आहेस. असं वाटतंय की जसं आमचं आयुष्य आता कुठे सुरु झालंय.” आलियाच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच रिद्धीमापासून ते अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

आलिया आणि रणबीरनं १४ एप्रिल रोजी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर जवळपास २ महिन्यानंतर आलियानं आई होणार असल्याची खुशखबर सर्व चाहत्यांना दिली होती. तर त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी आलियानं क्यूट मुलीला जन्म दिला. तेव्हापासून त्यांच्या चाहत्यांना प्रतिक्षा होती की ते आपल्या मुलीचं नाव नेमकं काय ठेवणार आहेत. तर आता राहा कपूर हे नावही लवकरच चर्चेत येणार हे निश्चित.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)