गरोदरपणा लपवण्याबाबत आलियाने केला खुलासा (Alia ...

गरोदरपणा लपवण्याबाबत आलियाने केला खुलासा (Alia Bhatt Reveals Why Did She Hide Her Pregnancy)

बॉलिवूडची लाडकी जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर काही महिन्यांपूर्वीच आईबाबा झाले आहेत. आलियाने नोव्हेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. त्यांनी आपल्या बाळाचे नाव राहा कपूर असे ठेवले. आलिया व तिचे बाळ तिच्या गरोदरपणापासूनच खूप चर्चेत होते. आलियाला मुलगा होणार की मुलगी याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

तिला मुलगी झाल्यावर कपूर आणि भट्ट कुटुंबासोबत तिच्या चाहत्यांनाही खूप आनंद झाला होता. खरेतर आलिया आणि रणबीरचे लग्न 14 एप्रिलला झाले होते. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच तिने आपण गरोदर असल्याचे सोशल मीडिया पोस्ट शेअर करुन सर्वांना सांगितले. तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आलियाचे बेबी बंपवरील फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. तिचे गरोदरपणातील ड्रेसिंग स्टाइल चाहत्यांना खूप आवडायची.

पण आलियाने सुरुवातीचा काही काळ आपले गरोदरपण सर्वांपासून लपवून ठेवले होते. याबाबतचा खुलासा तिने स्वत: एका मुलाखतीदरम्यान केला. आलिया म्हणाली की, “माझी प्रेग्नन्सी ही अनपेक्षित होती. त्यामुळे माझं शरीर मला काय सांगत आहे, याकडे मी लक्ष देत होते. काम महत्त्वाचं होतं, पण त्यावेळी माझं बाळ आणि माझं स्वास्थ्य याला मी प्राधान्य दिलं. परंतु, सुदैवाने गरोदरपणात शारीरिक त्रासामुळे माझं काम मागे पडलं नाही. सुरुवातीच्या काही दिवसांत मला थकवा जाणवायचा, मळमळ व्हायची.

पण तेव्हा मी याबाबत कोणाला काहीच बोलले नाही”.“पहिले १२ आठवडे गरोदरपणाबाबत कोणाला काही सांगायचं नसतं. म्हणून मला होणाऱ्या त्रासाबद्दल मी कोणाकडेही वाच्यता केली नाही. मी शूटिंगदरम्यान अनेकदा माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जेवढं शक्य होईल तितका आराम करायचे. जानेवारी २०२२ मध्ये मी ‘हार्ट ऑफ स्टोन’ हा माझा पहिलाच हॉलिवूड चित्रपट साइन केला होता. त्यामुळे त्याचं शूटिंग पूर्ण करणं गरजेचं होतं. गरोदर असताना मी माझ्या पहिल्या अॅक्शन चित्रपटाचं शूटिंग केलं आहे”, असं आलियाने मुलाखतीत सांगितले.