आक्षेपार्ह कमेंटस् बाबत आलिया भट्टचा आक्रमक पवि...

आक्षेपार्ह कमेंटस् बाबत आलिया भट्टचा आक्रमक पवित्रा (Alia Bhatt Raises Her Voice Against Troller’s Comments)

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. रणबीरसोबत लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी तिने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. तसेच पहिला हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगहून परतून आल्यावर तिने आपल्या आगामी डार्लिंग्स या चित्रपटाच्या प्रमोशनलाही सुरुवात केली आहे. आलियाचा डार्लिंग्स हा चित्रपट येत्या 5 ऑगस्टला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्या निमित्त आलिया वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थित राहत आहे. अशाच एका कार्यक्रमातील मुलाखतीत लोकांकडून केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह कमेंटबद्दल आलियाने तिचे मत व्यक्त केले.

सेलिब्रेटी म्हटलं की ट्रोलिंग हे होतच असतं. त्यात जर ती महिला सेलिब्रेटी असेल तर त्यांना वेगवेगळ्या लैंगिक कमेंटना सामोरे जावे लागते. याबाबत आलियाने म्हटले की, जेव्हा कोणत्याही महिलेस तिची ब्रा लपवण्याचा सल्ला दिला जातो ती गोष्ट मला अजिबात आवडत नाही. अनेकदा महिलांना त्यांची ब्रा बिछान्यावर ठेवू नका किंवा ती लपवून ठेवा असे म्हटले जाते जे एकदम चुकीचे आहे.

महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या दिवसांतही वेगळी वागणूक मिळते पण तसे का? हेच मला कळत नाही.  तुमचा जन्म हा देखील या मासिक पाळीमुळेच होतो ही गोष्ट लोक का विसरतात. मला अशा गोष्टी कोणी विचारल्या नाहीत पण मी अनेकदा आक्षेपार्ह कमेंटचा सामना केला आहे. मी त्या गोष्टींकडे कधीच लक्ष देत नाही.

मी त्याबाबत खूप जागरुक असते. जेव्हा मी अशा काही कमेंट वाचते तेव्हा त्या लैंगिक कमेंट असल्याचे मला जाणवते. त्यावेळेस मी खूप आक्रमक होते. मी मुळात खूप संवेदनशील व्यक्ती आहे. लोक मला इतकी संवेदनशील होऊ नकोस असे सल्ले नेहमीच देत असतात.