अक्षय तृतीया एक पावन तिथी (Akshay Trutiya : Why...

अक्षय तृतीया एक पावन तिथी (Akshay Trutiya : Why This Is Treated As A Sacred Day)

अक्षय तृतीया एक पावन तिथी

 • संगीता वाईकर
  अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. हा दिवस सौभाग्य आणि समृद्धीचा निदर्शक आहे. अक्षय तृतीयेला ’अभिजित’, किंवा ’सर्व सिद्धी’ मुहूर्त असेही म्हणतात. कारण या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते. पूर्वापार असा विश्वास आहे की, हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात नशीब आणि यश घेऊन येतो.
  अक्षय तृतीया म्हणजे हिंदू संस्कृतीत मानला जाणारा एक शुभ दिवस. हा दिवस शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो. एखाद्या नव्या कार्याला प्रारंभ करायचा झाल्यास हा एक उत्तम दिवस मानला जातो.
 • एक पावन तिथी
  वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. यालाच ’अखजी’ किंवा ’वैशाख तीज ’असेही संबोधले जाते. या दिवशी केलेल्या कार्याचे शुभ फल प्राप्त होते, असे सांगितले जाते. हा सण भारतातील विशेष सणांच्या श्रेणीत ठेवला आहे. या दिवशी आपल्या कुवती नुसार स्नान, दान, जप, होम इत्यादी जे काही केले जाते ते अक्षय स्वरूपात प्राप्त होते.
  आख्यायिकेनुसार विष्णू पार्वतीचे स्वामित्व असलेली ही एक पावन तिथी आहे. या दिवशी केलेल्या देव पूजेमुळे घराण्यातील दोष नष्ट होतात असे मानले जाते. भारतीय संस्कृतीत या दिवशी कुलदेवतेचे पूजन केले जाते. ते ठाऊक नसल्यास आपले श्रद्धास्थान असलेल्या देवतेचे पूजन करून ’कुलदैवताय नम:’ म्हणून पूजन केले जाते. तसेच धर्माच्या रक्षणासाठी, भगवान विष्णूची तीन शुभ रूपं देखील अक्षय तृतीयेच्या एकाच दिवशी अवतरली असे मानले जाते.
 • जलदानाचे महत्त्व
  उन्हाळी हंगामाचे आगमन, शेतातील पिके पक्व होणे, आणि शेतकरी व ग्रामस्थ यांचा आनंद साजरा करण्याचा हा कालावधी, उपवास, व्रत, पूजा करून या सणाच्या निमित्ताने सुरुवात करतात. वैशाख महिना म्हटला की सर्व धरा रणरणत्या उन्हाने तप्त होते, जिवाची काहिली होते, त्यामुळे तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे, मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची सोय करणे यामुळे पुण्य प्राप्ती केल्याचे समाधान मिळते. म्हणूनच जलदानाचे महत्त्व या सणाच्या निमित्ताने सांगितले जाते. या दिवशी पाणपोई देखील सुरू केली जाते. मठातील किंवा रांजणातील थंड पाणी आरोग्यासाठी हितकर असते. आंबा हा फळांचा राजा, त्याचे सेवन याच दिवशी पासून केले जाते आणि गोरगरिबांना दान दिले जाते.
 • पर्यावरणाचे संतुलन
  निसर्ग आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे त्यामुळे वृक्ष संपदा जपणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. वृक्षांना पाणी देणे, त्यांचे संवर्धन करणे, पशू पक्षांना चारा – पाणी देणे, यामुळे अनेक दोषांचे निवारण केले जाते आणि पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी एक प्रयत्न आपल्याकडून केला जातो. पशू, पक्षी, वृक्ष, वेली ही आपली अनमोल संपत्ती आहे. ती वाचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हेच या पूजेमागील महत्त्वपूर्ण शास्त्रीय कारण आहे.
  साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा शुभ मुहूर्त. या दिवशी गृह प्रवेश, विवाह मुहूर्त, वाहन खरेदी, नवी जागा घेणे, नवे व्यवसाय सुरू करणे, मंडळे स्थापन करणे, उद्घाटन करणे तसेच सोने खरेदी करणे यासारखी शुभ कार्ये आवर्जून केली जातात. नवे वस्त्र, शस्त्र, दागिने यांची खरेदी या दिवशी मोठ्या प्रमाणावर केली जाते. ज्यांची रखडलेली कामे होत नाहीत, कोणत्याही कामासाठी शुभ मुहूर्त मिळत नसेल तर त्यांच्यासाठी हा अक्षय तृतीयेचा दिवस कोणतीही नवी सुरुवात करण्यास अतिशय शुभ मानला जातो.
 • सत्य युग आणि त्रेता युगाचा प्रारंभ
  अक्षय तृतीयेच्या दिवशी नदी किंवा समुद्रात स्नान केल्यास पापातून मुक्त होता येते, असे मानले जाते. तसेच ब्राह्मणाला पंखा, चप्पल, छत्री, तांदूळ, मीठ, तूप, साखर, वस्त्र, चिंच, फळं, दक्षिणा देऊन ब्राम्हण भोजन दिले जाते. या दिवशी दानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
  वाढते तापमान असल्यामुळे आपल्या संस्कृतीत आहार विहार कसा असावा याकडेही आवर्जून लक्ष दिले जाते. या काळात ’सातू’ चे सेवन उपयुक्त आहे. तसेच वाळा घातलेले सुगंधी पाणी, कैरीचे पन्हे, आमरस यांचा देखील आरोग्य उत्तम राखण्याच्या दृष्टीने अतिशय चांगला
  उपयोग होतो.
  शास्त्रामध्ये अक्षय तृतीयेपासून सत्य युग आणि त्रेता युगाचा प्रारंभ झाला. याच दिवशी नर नारायणाने अवतार घेतला, तसेच परशुरामाचेही अवतरण याच दिवशी झाले. या दिवशी परशुरामाचे पूजन करून त्यांना अर्ध्य दिले जाते, याच दिवशी चार धाम मधील एक बद्रीनारायणाचे दरवाजे देखील उघडतात. वृंदावनच्या बांके बिहारी मंदिरात या दिवशी श्री विग्रहाचे चरण दर्शन घेतात. बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. सुख, शांती आणि सौभाग्यासाठी शिव आणि माता पार्वती यांचे पूजन करणे देखील या दिवशी शुभ मानले जाते.
  आख्यायिकेनुसार प्रभू श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, अक्षय तृतीया या तिथीस केलेले दान, हवन क्षयास जात नाही. म्हणून या तिथीला ’अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे. यासोबतच महाभारताच्या काळात पांडवांच्या भगवान श्रीकृष्णाकडून अक्षयपात्र घेतल्याचा उल्लेख आहे. या दिवशी सुदामा आणि कुलेचा यांना भगवान श्रीकृष्णाकडून मूठभर भाजलेले तांदूळ मिळतात. या दिवशी सोमवार आणि रोहिणी नक्षत्र असेल तर हा मुहूर्त अधिक शुभदायक असतो.
 • पूर्वजांचे स्मरण
  देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होते. पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी तसेच त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी त्यांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. या दिवशी मातीचा माठ आणून त्यात वाळा घालून सुगंधित पाण्याने भरलेला माठ दान केला जातो. त्यामुळे पितरांना संतोष होतो असे मानले जाते. या सणाला पळसाच्या पानांच्या पत्रावळीवर व द्रोणात खीर, पन्हे, चींचवणे, पापड, कुरडई असे भोजन दिले जाते.
 • अक्षय समृद्धी
  अक्षय तृतीया हा दिवस उपवासासाठी सर्वोत्तम मानला जातो. भगवान विष्णूचे पूजन, कथा आणि विष्णू सहस्रनाम यांचे पठण केले जाते. या दिवसाला ’नवान्न पर्व’ असेही म्हणतात. हा दिवस सौभाग्य आणि समृद्धीचा निदर्शक आहे. अक्षय तृतीयेला ’अभिजित’, किंवा ’सर्व सिद्धी’ मुहूर्त असेही म्हणतात. कारण या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते. पूर्वापार असा विश्वास आहे की हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात नशीब आणि यश घेऊन येतो.
  अक्षय तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख आणि समृद्धी प्राप्त करून देणार्‍या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्‍या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे. भारताच्या विविध प्रांतात व प्रदेशात हा सण विविधतेने साजरा केला जातो. त्यामागे असलेले कारण अक्षय समृद्धी हेच आहे.