अक्षय कुमारची आई हॉस्पिटलात; शूटिंग सोडून अक्षय...
अक्षय कुमारची आई हॉस्पिटलात; शूटिंग सोडून अक्षय मुंबईत दाखल (Akshay Kumar’s Mother Admitted To The ICU, Actor Hastily Flies Back From UK)

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना मुंबईतील एका हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे. सध्या लंडनमध्ये ‘सिंड्रेला’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेला अक्षय कुमार आईच्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी मिळाल्यानंतर शूटिंग सोडून मुंबईत परतला आहे.

अक्षयची आई अरुणा भाटिया सध्या आयसीयूमध्ये आहे. कालपासून, मीडिया रिपोर्ट्समध्ये त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात होते परंतु, अक्षय कुमारच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याची आई फार गंभीर नसल्याचे उघड केले आहे. त्या ७७ वर्षांच्या आहेत आणि त्यांना वयोमानानुसार आरोग्य समस्या आहे. त्या बऱ्याच काळापासून आजारी होत्या, ज्यामुळे तीन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आपल्याला माहीत आहे की, अक्षय कुमार हा पूर्णतः कौटुंबिक माणूस आहे आणि सर्वप्रथम तो आपल्या कुटुंबाला प्राधान्य देणारा आहे. विशेषतः तो त्याची आई अरुणा भाटियाच्या खूप जवळ आहे. गेल्या वर्षी, जेव्हा अक्षय कुमार लंडनमध्ये ‘बेल बॉटम’ चं शूटिंग करत होता, तेव्हा त्यानं त्याच्या आईसोबत वेळ घालवण्याबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. मातृदिनानिमित्तही त्यानं आईसोबतचा फोटो शेअर केला आणि ‘आईसारखा कोणी नाही’ असं लिहिलं होतं. असं आई आणि लेकाचं नातं असल्यानं, आईची तब्येत बिघडल्यावर त्याला त्याच्या आईबरोबर राहायचं होतं, म्हणून आईला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी मिळताच तो मुंबईला परतला.

अक्षय कुमार आईसाठी परतला असला तरी त्यानं शूटिंग अपूर्ण सोडलं नाही. कारण तो जेवढा कौटुंबिक आहे तितकाच स्वतःच्या कामाबद्दल व्यावसायिक आहे. लंडनमध्ये त्याचं शूटिंग पूर्ण झालं होतं आणि ते १० तारखेला भारतात परतणार होते. नंतर ‘रक्षाबंधन’चे शूटिंग पुन्हा सुरू करणार होते. त्यानंतर तो फॅमिलीसाठी सुट्टीवर जाणार होता. त्यामुळे त्याचं संपूर्ण वेळापत्रक आधीच ठरलेलं होतं.

त्याच्या कामाबाबत बोलायचं तर, सध्या अक्षय कुमारचे ९ प्रोजेक्ट पाईप लाईनमध्ये आहेत. आठ चित्रपट आणि एक वेब मालिका. अक्षय कुमार लंडनमध्ये त्याच्या आगामी ‘सिंड्रेला’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. याशिवाय तो बेल बॉटम, सूर्यवंशी, अतरंगी रे, पृथ्वीराज, बच्चन पांडे, रक्षाबंधन, राम सेतू, ओएमजी-ओह माय गॉड २ आणि वेब सिरीज द एंड मध्येही दिसणार आहे.