मुंबई पोलिसांच्या कार्यक्रमामध्ये अक्षय कुमारच्...

मुंबई पोलिसांच्या कार्यक्रमामध्ये अक्षय कुमारच्या हस्ते इलेक्ट्रिक स्कूटरचे उद्घाटन (Akshay Kumar unveils Electric Scooter in Mumbai Police show)

एका नेत्यामध्ये जी देशभक्ती असावी ती देशभक्ती अक्षय कुमार या अभिनेत्यामध्ये कायम दिसून येते. देशाबद्दल वाटणारा आदर, भक्ती ही त्याच्या केवळ चित्रपटांतूनच नाही तर त्याच्या वागणूकीतूनही दिसते. नुकतेच मुंबई पोलिसांच्या सहकार्यासाठी एका कार्यक्रमामध्ये तो सहभागी झाला. मुंबईतील पोलिसांसाठी बनविण्यात आलेल्या नवीन उपकरणाचं या कार्यक्रमामध्ये उद्‌घाटन होतं. मुंबईच्या पोलीस विभागामध्ये पेट्रोलिंगसाठी सेल्फ बॅलेन्सिंग वाहन फ्रीगो बाइकचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस ही बाईक वरळी आणि कार्टर रोड परिसरामध्ये पेट्रोलिंगसाठी वापरणार आहेत.

या कार्यक्रमाचा व्हिडिओ अक्षयने आपल्या सोशल अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याने असं म्हटलं आहे की, ”मुंबई पोलीस विभागामध्ये पेट्रोलिंगसाठी सामील झालेली सेल्फ बॅलेन्सिंग फ्रीगो वरळी आणि कार्टर रोड परिसरामध्ये पेट्रोलिंगसाठी वापरण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या या जागतिक स्तरावरील आधुनिकीकरणामुळे मी अतिशय खुश आहे.”

या कार्यक्रमामध्ये अक्षय कुमार सोबत आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख देखील उपस्थित होते. यावेळी अक्षयकुमार सह उपस्थित सगळ्यांनी टाळ्या वाजवून इलेक्ट्रिक स्कूटरचे स्वागत केले. अक्षय कुमारच्या मनात, मुंबई पोलीस आणि आर्मी यांच्या प्रती कायम हळवा कोपरा आहे. त्यांच्याशी निगडीत जवळपास सर्व कार्यक्रमामध्ये तो सहभागी असतो. अशा कार्यक्रमांतून सहभागी होऊन तो आपल्या पोलीस आणि सैनिकांना प्रोत्साहित करतो. या कार्यक्रमासाठी येतानाही तो मास्क लावून तसेच सोशल डिस्टस्निंगचे पालन करताना दिसला. यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटामध्ये अक्षय कुमार एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.