‘बॉयकॉट रक्षाबंधन’ वर अक्षय कुमारचे सडेतोड उत्त...

‘बॉयकॉट रक्षाबंधन’ वर अक्षय कुमारचे सडेतोड उत्तर, – म्हणाला, ‘जर तुमची इच्छा नसेल तर चित्रपट बघू नका. आपल्या स्वतंत्र देशात प्रत्येकाला हवं ते करण्याची मुभा आहे.’ (Akshay Kumar reacts to boycott Raksha Bandhan trend, Says- If you don’t feel like watching the movie, then don’t. Its a free country)

आमिर खान (Aamir Khan)च्या ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटानंतर आता अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ (Raksha Bandhan) हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच बहिष्कृत करण्याच्या मार्गावर आहे. हे दोनही चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून नेटकरी या चित्रपटाला विरोध करताना दिसत आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच #BoycottRakshaBandhan हा ट्रेंड सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतंच अभिनेता अक्षय कुमारने चित्रपटांना विरोध करण्याच्या आणि त्यावर बहिष्कार टाकण्याच्या ट्रेंडवर खुलेपणाने भाष्य केले आहे.

येत्या ११ ऑगस्टला अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘रक्षाबंधन’ प्रदर्शित होत आहे. सध्या अक्षय या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान अक्षयला हिंदी चित्रपटांना सातत्याने होणाऱ्या विरोधावर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना अक्षयने, “जर तुमची इच्छा नसेल तर चित्रपट बघू नका, त्यावर बहिष्कार कशाला टाकता? अशाप्रकारे कोणत्याही चित्रपटावर बहिष्कार टाकू नका,” अशी विनंती केली आहे.

यापुढे तो म्हणाला, “सोशल मीडियावर फार कमी लोक आहेत, जे अशाप्रकारे खोडसाळपणा करताना दिसत आहेत. पण हरकत नाही. आपला देश एक स्वतंत्र देश आहे आणि आपल्या देशात प्रत्येकाला हवं ते करण्याची मुभा आहे. हे सर्व करताना एक लक्षात ठेवा, ते म्हणजे वस्त्रोद्योग असो वा फिल्म इंडस्ट्री ती भारताच्या अर्थव्यवस्थेस हातभार लावत असते. तेव्हा अशाप्रकारच्या गोष्टी करण्यात काहीही अर्थ नाही. मी नेटकरी आणि मीडियाला विनंती करतो की त्यांनी यात सहभागी होऊ नये.”

रक्षाबंधन हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. एक भाऊ आणि चार बहिणींच्या नातेसंबंधावर आधारित या चित्रपटासाठी अभिनेता अक्षय कुमार अतिशय मेहनत घेत आहे. परंतु प्रदर्शनापूर्वीच सोशल मीडियावर या चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. या चित्रपटावर अनेक आरोप केले जात आहेत. एकतर हा चित्रपट पाकिस्तानी चित्रपटावरून घेतला गेला असल्याचे म्हटले जात आहे. आणि दुसरे म्हणजे या चित्रपटाची लेखिका कनिका ढिल्लो हिच्या जुन्या ट्वीटवरून नाराजी व्यक्त केली जात आहे, ज्यात तिने गोमुत्र, हिजाब प्रतिबंध आणि सांप्रदायिक लिंचिंग बाबत लिहिलं होतं.

आनंद एल राय दिग्दर्शित रक्षाबंधन या चित्रपटात अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, सादिया खतीब, सहजीन कौर, स्मृती श्रीकांत आणि दीपिका खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट कौटुंबिक मनोरंजन प्रकारातील असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ, कलर यलो प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी संयुक्तपणे केली आहे.