निर्भया कांडनंतर अक्षय कुमारने 90 हजार महिलांना...

निर्भया कांडनंतर अक्षय कुमारने 90 हजार महिलांना दिले सेल्फ डिफेंन्सचे धडे (Akshay Kumar Has Given Free Self Defence Training To 90 Thousand Women After Nirbhaya Case To Make Them Self-Secured)

नववर्षाच्या सुरुवातीलाच दिल्लीतील कांझावाला भागात एका मुलीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हादरला आहे. मुलीवर आधी बलात्कार झाला, आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा दावा मुलीच्या आईने केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण झाले आहे. या घटनेने लोकांना पुन्हा एकदा निर्भया घटनेची आठवण झाली.

अक्षय कुमारनेही ‘कौन बनेगा करोडपती 14’ मध्ये आजपर्यंत क्वचितच कोणाला माहिती असेल अशा गोष्टींचा खुलासा केला. निर्भया प्रकरणानंतर आपण हजारो मुलींना मोफत मार्शल आर्ट शिकवल्याचे सांगितले.

2012 मध्ये घडलेले निर्भया हत्याकांड आजही सर्वांच्या लक्षात आहे.  या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारही यामुळे हादरला आणि त्याने महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच, अक्षय कुमारने ‘कौन बनेगा करोडपती 14’ मध्ये खुलासा केला की त्याने ‘निर्भया घटने’नंतर अनेक महिलांना स्वत:चे संरक्षण कसे करावे याबद्दल सांगितले.

अलीकडेच अक्षय कुमार ‘KBC 14’ च्या शेवटच्या आठवड्यात पाहुणा म्हणून गेला होता. तेव्हा त्याने सांगितले की,निर्भयाच्या घटनेने मी देखील पूर्णपणे हादरलो होतो. यानंतर मला वाटले की महिलांना आपल्या सुरक्षेसाठी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, म्हणून मी महिलांना मार्शल आर्ट शिकवायचे ठरवले. “2012 मधील निर्भया प्रकरणानंतर, मी 2013 मध्ये महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत 90,000 महिलांना मार्शल आर्टचे प्रशिक्षण दिले आहे.”

अक्षय कुमार पुढे म्हणाला, “आज मी माझ्या आयुष्यात जिथे उभा आहे, त्याचे कारण अभिनय नसून मार्शल आर्ट्स, स्वसंरक्षण आणि शिस्त आहे. म्हणूनच मी भारतात अनेक ठिकाणी स्वसंरक्षणाचे वर्ग सुरू केले आहेत.

90 हजार महिलांना मोफत प्रशिक्षण देणारा अक्षय कुमार म्हणाला, “या मोहिमेला 10 वर्षे झाली आहेत आणि आतापर्यंत आम्ही 90 हजार महिलांना मार्शल आर्टचे मोफत प्रशिक्षण दिले आहे.” मी अनेक वर्षे थायलंडमध्येही मार्शल आर्ट्स शिकवले आहे. अभिनयात येण्यापूर्वी अक्षय मार्शल आर्टचा प्रशिक्षक होता.

केबीसीमध्ये सुद्धा त्याने महिलांना स्वसंरक्षणाच्या काही टिप्स दिल्या. तसेच “मोठ मोठ्याने ओरडणे हा सर्वोत्तम स्वसंरक्षणाचा उपाय आहे. यानंतर निरीक्षण येते. जर तुम्ही निर्जन रस्त्यावर कुठेतरी जात असाल तर त्या जागेचे सतत निरीक्षण करा. हे तुम्हाला खूप मदत करेल असेही अक्षय म्हणाला.