अक्षयकुमारच्या प्रेमिकांची लांबलचक यादी (Akshay...

अक्षयकुमारच्या प्रेमिकांची लांबलचक यादी (Akshay Kumar And His Love Affairs : He Dated These 7 Bollywood Actresses)

बॉलिवूडचा टॉप स्टार गणला गेलेला अभिनेता अक्षयकुमार फारच आघाडीवर आहे. प्रेमप्रकरणांच्या बाबतीतही त्याने मोठीच आघाडी मारली आहे. कारण त्याच्या प्रेमिकांची यादी लांबलचक आहे, असं लोक म्हणतात. त्या अज्ञात प्रेमिकांचे राहू द्या, पण अक्षयने बॉलिवूडच्या या ७ हिरॉईन्स बरोबर बरीच इश्कबाजी केलेली आहे.

१.आयेशा जुल्का

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आयेशा जुल्काचे नाव अक्षयकुमार सोबत सर्वप्रथम जोडले गेले होते. १९९२ साली आयेशाने ‘खिलाडी’ या चित्रपटात अक्षयसोबत काम केले. चित्रपट खूपच यशस्वी ठरला नि हे दोघे रातोरात स्टार बनले. प्रेक्षकांना ही जोडी खूपच आवडली. चित्रपटाच्या निर्मिती अवस्थेतच अक्षय आणि आयेशाच्या प्रेमप्रकरणाच्या वार्ता पसरल्या होत्या. दोघांनीही त्याला पुष्टी दिली नाही. पण बराच काळ त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगत राहिल्या. मात्र पुढे हे संबंध टिकले नाहीत.

२. पूजा बत्रा

मॉडेल आणि बॉलिवूडमध्ये आलेली उंचाडी अभिनेत्री पूजा बत्रा हिचे नाव देखील अक्षयकुमारशी जोडले गेले होते. असं म्हणतात की, बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याच्या आधीपासूनच अक्षयची पूजाशी इश्कबाजी चालू होती. पूजामुळे अक्षयला कित्येक पार्ट्यांमध्ये एन्ट्री मिळत होती. पण बॉलिवूडमध्ये यश मिळताच या इश्क कुमाराने तिची साथ सोडली.

३. रविना टंडन

मस्त-मस्त गर्ल अशी प्रसिद्धी पावलेल्या रविना टंडनशी, अक्षयकुमारचे प्रेमप्रकरण बरेच दिवस चर्चेत होतं. या दोघांचे बरेच चित्रपट गाजले. ‘मोहरा’ या चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ या मादक गाण्यामध्ये अक्षयकुमार आणि रविना टंडन यांचे हावभाव इतके अस्सल होते की, लोकांच्या डोळ्यासमोर अजूनही ते गाणे आहे. या दोघांचे प्रेमप्रकरण तीन वर्षे टिकले. त्याची चर्चा मीडियामध्ये  खूपच चालली होती. तेव्हा तर अशाही बातम्या मिळाल्या होत्या की, रविनाने हे प्रेम गंभीरपणे घेतले असून ती त्याच्याशी लग्न करण्याच्या मार्गावर होती. पण अक्षयच्या बेलगाम वागण्याने हे संबंध बिघडले नि दोघेही कायमचे वेगळे झाले.

४. शिल्पा शेट्टी

९०च्या दशकात अक्षयकुमार आणि शिल्पा शेट्टी म्हणजे हॉट कपल मानले जात होते. रविनाशी ब्रेकअप होताच, अक्षयच्या जीवनात तिची जागा शिल्पाने घेतली. दोघांचे संबंध इतके घनिष्ट झाले होते की, ते लग्न करतील, असंच लोकांना वाटत होतं. पण अक्षयचं मन ट्विंकल खन्नावर बसलं. शिल्पाला ते सहन झालं नाही अन्‌ तिनं अक्षयशी संबंध तोडले.

५. ट्विंकल खन्ना

एक-दोन चित्रपटात अक्षयकुमारची, ट्विंकल खन्नाशी जोडी जमली. अन्‌ त्याच्या स्वभावानुसार प्रेमही जुळले. मात्र ही भानगड वाढवत राहण्यापेक्षा ट्विंकलने अक्षयसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा त्याने नकार दिला. पण ट्विंकल ही इतर प्रेयसींप्रमाणे नव्हती. तिने त्याच्यावर एवढे दडपण आणले की, त्याला तिच्याशी लग्न करणे भाग पडले.

६. प्रियंका चोप्रा

लग्नानंतर देखील अक्षयकुमारची लफडी चालूच राहिली. प्रियंका चोप्राने त्याच्या बरोबर काही चित्रपट केले. त्या दरम्यान दोघांचे प्रेम जुळले. ट्विंकलच्या कानी हे प्रकरण गेलं तेव्हा तिने अक्षयला प्रियंका सोबत काम करण्याची मनाई केली. लग्नासाठी ट्विंकलने अक्षयवर ज्या पद्धतीने दबाव टाकला होता, तसाच दबाव कदाचित तिने प्रियंकाचा नाद सोडण्याबाबत टाकला असावा. त्यामुळे अक्षयने प्रियंकाचा नाद सोडला आणि तो आपल्या संसारात रमला.

७. रेखा

‘खिलाडीयों के खिलाडी’ या चित्रपटात अक्षय, प्रेमात मुरलेल्या रेखा सोबत काम करत होता. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांच्या जवळिकीच्या वावड्या उठल्या. अन्‌ अक्षयचे रेखाशी नाव जोडले गेले. पण हे नाते जास्त दिवस टिकले नाही.