सोलापूरच्या अक्षय इंडीकरचा कॅनडात डंका, OIFFA फ...

सोलापूरच्या अक्षय इंडीकरचा कॅनडात डंका, OIFFA फिल्म फेस्टीव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार (Akshay Indikar From Solapur Bags Best Director Award In Canada For His Marathi Film)

सोलापूरचा मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकर यास कॅनडामध्ये दरवर्षी पार पडणाऱ्या ओटावा इंडियन फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड सोहळ्यात त्याच्या ‘स्थलपुराण’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. तर याच सिनेमातील नील देशमुख या बालकलाकाराला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.

हे पुरस्कार जाहीर होताच अक्षयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केलाय. यात तो म्हणाला, “कॅनडा मधील चित्रपट महोत्सवात मला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार जाहीर झाला आहे. माझ्या संपूर्ण टिमचं हे यश आहे. हा पुरस्कार मी माझ्या मराठी भाषेला अर्पण करतो.”

‘ओटावा इंडियन फिल्म फेस्टिव्हल’ चे २२ ते २६ जून या दरम्यान आयोजन करण्यात आले होते. ‘स्थलपुराण’ या सिनेमाला याआधी देखील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. या सिनेमात दिघू नावाच्या एका आठ वर्षाच्या मुलाची गोष्ट सांगण्यात आली आहे. वडिल बेपत्ता झाल्यानंतर दिघूच्या बालमनाची झालेली नाजूक अवस्था, त्यानंतर वडिलांचा शोध घेण्यासाठी त्याची धडपड या सिनेमात पाहायला मिळते.

अक्षय इंडीकर हे नाव चित्रपटसृष्टीबरोबरच रसिक प्रेक्षकांनाही चांगलंच परिचयाचं झालेलं आहे. मराठीतील पहिली डॉक्यु-फिक्शन फिल्म ‘उदाहरणार्थ नेमाडे’ असो किंवा ‘त्रिज्या’, अशा अनोख्या पठडीतल्या सिनेमांच्या माध्यमातून अक्षयने या आधीही आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सिनेमांची ओळख निर्माण केलीय. आता अक्षयला ‘स्थलपुराण’ या सिनेमासाठी प्राप्त झालेला हा पुरस्कार मराठी सिनेसृष्टीसोबतच देशासाठी देखील गर्वाची बाब आहे.

 (फोटो सौजन्य – ट्वीटर / अक्षय इंडीकर)