लेक आराध्याच्या ११ व्या वाढदिवशी ऐश्वर्याने शेअ...

लेक आराध्याच्या ११ व्या वाढदिवशी ऐश्वर्याने शेअर केली खास पोस्ट; पण लिप किसच्या फोटोमुळे झाली ट्रोल (Aishwarya Rai Bachchan Trolled For Lip Kiss With Daughter Aaradhya Bachchan On Her Birthday)

आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनची मुलगी आराध्या हिचा आज ११ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याने तिच्यासोबतचा खास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

याच फोटोवरून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी यात ऐश्वर्याची बाजूही घेतली आहे. ऐश्वर्याचा हा फोटो काहींना आवडला तर काहींना खटकला. विशेष म्हणजे मुलगी आराध्यासोबतचा तिचा हा खास फोटो आहे, ज्यावरून ऐश्वर्याला ट्रोल केले जात आहे.

‘माझं प्रेम, माझं आयुष्य, आराध्या तुला खूप सारं प्रेम’, अशी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे. या फोटोमध्ये ती आराध्याला प्रेमाने किस करताना दिसतेय. मात्र या फोटोमध्ये ती आराध्याला ओठांवर किस करत असल्याने नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

आराध्या आणि ऐश्वर्याच्या लिप किसवरून याआधीही वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा लिप किसच्या फोटोमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ऐश्वर्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर काही लोकांनी या फोटोवर कमेंट करत आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘हे चांगलं नाही’, असं एकाने म्हटलंय. ‘तुझ्या मुलीवर तुझं किती प्रेम आहे हे आम्हाला ठाऊक आहे. पण हा फोटो खूप अती आहे. तू वर्ल्ड इन्फ्लुएन्सर आहेस हे लक्षात ठेव. या पोस्टचा काही चाहत्यांवर कसा नकारात्मक परिणाम होईल याचा विचार कर’, असं दुसऱ्या युजरने लिहिलंय.

विशेष म्हणजे या कमेंट सेक्शनमध्ये ऐश्वर्याची बाजू मांडणारेही अनेक आहेत. ‘आई आणि मुलीच्या प्रेमाला तरी समजा’, असं काहींनी म्हटलंय. तर ‘काही जण उगाचच या फोटोवरून नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करतायत’, असं म्हणत चाहत्यांनी ऐश्वर्याची बाजू घेतली.

ऐश्वर्या आणि अभिषेकने २००७ मध्ये लग्न केलं. तर २०११ मध्ये या दोघांच्या आयुष्यात आराध्याचं आगमन झालं. आराध्या अनेकदा तिच्या आईवडिलांसोबत विविध कार्यक्रमांमध्ये दिसते. ऐश्वर्याच्या ‘पोन्नियिन सेल्वन- 1’ या चित्रपटाच्या सेटवरही तिने खास हजेरी लावली होती.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)