लागोपाठ चित्रपट फ्लॉप झाल्याने आयुष्मान खुराना ...

लागोपाठ चित्रपट फ्लॉप झाल्याने आयुष्मान खुराना याने आपल्या फीमध्ये केली तब्बल 10 कोटींची घट (After two back-to-back failures, Ayushmann Khurrana slashes his remuneration to Rs. 15 crores)

विकी डोनर, बरेली की बर्फी, शुभ मंगल ज्यादा सावधान, बधाई हो, अंधाधुन आणि ड्रीम गर्ल यांसारखे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या आयुष्मान खुराना याने आपल्या टॅलंटच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले खास स्थान निर्माण केले आहे. पण आयुष्मान याने आता आपली फी कमी केली असून त्यासाठी चाहते त्याचे भरभरुन कौतुक करत आहेत.

सोशल मीडियावर बहिष्काराची मागणी आणि कोविडच्या प्रादूर्भावामुळे बॉलिवूडला उतरती कळा लागली आहे. बिग बजेट, तसेच मोठमोठी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटांनाही चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आयुष्मान खुरानाने आपली फी १० कोटींनी कमी केल्याची बातमी समोर आली आहे.

आयुष्मानचे मागील काही चित्रपट लागोपाठ फ्लॉप झाले त्यामुऴे त्याने हा निर्णय घेतला आहे. त्याचे यापूर्वीचे ‘अनेक’ आणि ‘चंडीगढ करे आशिकी’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाही. त्यामुळे आयुष्मानने आपल्या फीमध्ये 10 कोटींची घट केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष्मान खुराना आतापर्यंत २५ कोटी रुपये साइनिंग फी म्हणून घेत होता. मात्र त्याने आता ती 15 कोटी केली आहे.

उर्वरित 10 कोटी रुपये तो चित्रपटाच्या नफ्याच्या हिश्श्यानुसार घेणार असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे त्याचा चित्रपट हिट ठरला तर तो पूर्वीपेक्षा जास्त कमाई करू शकतो. त्याच्या निर्मात्यांच्या सांगण्यावरून त्याने हे काम केल्याचे बोलले जात आहे. त्याच्या आगामी चित्रपटांच्या निर्मात्यांनी त्याला सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन फी थोडी कमी करण्याची विनंती केली होती, जी त्याने मान्यही केली.

या कठीण काळात बॉलिवूडला साथ देण्यासाठी आपली फी कमी करणारा आयुष्मान खुराना हा एकमेव अभिनेता नाही अक्षय कुमारने देखील आपली फी 144 कोटींवरून 72 कोटी रुपये केली आहे. त्याचवेळी जॉन अब्राहम, शाहिद कपूर आणि राजकुमार राव यांसारख्या कलाकारांनीही आपली फी अर्ध्याने कमी केली आहे.

आयुष्मानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच डॉक्टर जी आणि ड्रीम गर्ल 2 मध्ये दिसणार आहे.