अमिताभ बच्चन यांना 12 फ्लॉप चित्रपटांनंतर मिळाल...

अमिताभ बच्चन यांना 12 फ्लॉप चित्रपटांनंतर मिळाली होती अॅन्ग्री यंग मॅन ओळख (After many rejections and 12 flops, Amitabh Bachchan became angry young man, know the interesting journey of Big B)

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि महानायक अमिताभ बच्चन 80 वर्षांचे झाले आहेत. बिग बींनी हिंदी चित्रपटसृष्टीवर 50 वर्षांहून अधिक काळ राज्य केले. वयाच्या 80 व्या वर्षीही बिग बींना सतत चित्रपटांच्या ऑफर येत असतात. पण बिग बींच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक वेळा नकारांना सामोरे जावे लागले होते. याशिवाय जवळपास 12 फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर अमिताभ बच्चन यांची करीअरची गाडी रुळावर आली.

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे जवळपास 12 चित्रपट फ्लॉप झाले होते. सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे लोक त्यांना फेल न्यूकमर म्हणू लागले, पण नंतर त्यांचा ‘जंजीर’ चित्रपट आला, त्यामुळे बिग बींचे नशीब रातोरात बदलले आणि या चित्रपटातून ते बॉलिवूडचा अँग्री यंग मॅन बनले. या चित्रपटाच्या यशानंतर बिग बींनी मागे वळून पाहिले नाही.

चित्रपट दुनियेत येण्याआधी, वयाच्या २१ व्या वर्षी अमिताभ नोकरीच्या शोधात कोलकात्याला गेले होते. तिथे त्यांनी शॉ वॉलेस नावाच्या एका मद्य कंपनीत आणि बर्ड अँड कंपनी या शिपिंग फर्ममध्ये छोटीशी नोकरी केली. दोन्ही नोकऱ्या गेल्यावर त्यांना आयसीआय कंपनीत तिसरी नोकरी मिळाली. या कंपनीत त्यांना 1500 रुपये पगार मिळत असे. यादरम्यान त्यांची भेट एका महाराष्ट्रीयन मुलीशी झाली, आणि तिच्या ते प्रेमात पडले.

अमिताभ यांना त्या मुलीशी लग्न करायचे होते त्यासाठी त्यांनी त्या मुलीसमोर अनेकदा लग्नाचा प्रस्तावही ठेवला होता, पण त्या मुलीने प्रत्येक वेळी हा प्रस्ताव धुडकावून लावला. पहिल्या प्रेमात अपयश मिळाल्याने ते इतके दु:खी झाले की त्यांनी अचानक २६ दिवसांचा पगार न घेता नोकरी सोडली. त्या मुलीच्या आठवणी विसरण्यासाठी अमिताभ मुंबईला आले. आणि नवीन नोकरी शोधू लागले.  पण 6 फूट 3 इंच उंच आणि गव्हाळ रंगामुळे अमिताभला अनेकदा नकाराचा सामना करावा लागला.

अनेक वर्षांच्या खडतर संघर्षानंतर अमिताभ यांना ख्वाजा अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटासाठी अमिताभ यांना 5 हजार रुपये फी देखील मिळाली होती, पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो बॉक्स ऑफिस पूर्ण फ्लॉप झाला. त्यानंतरही त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप होत राहिले, मग 1973 मध्ये आलेल्या ‘जंजीर’ चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार बनवले. 50 दशकांपासून इंडस्ट्रीत सक्रिय असलेले अमिताभ बच्चन यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.