नातवंडं सांभाळण्यासाठी एक खात्रीशीर उपाय (Adopt...

नातवंडं सांभाळण्यासाठी एक खात्रीशीर उपाय (Adopt These New Solutions To Take Care Of Grandchildren)

आजी-आजोबांना नातवंडं अधिक प्रिय असतात. तर बाळांच्या आवडीनुसार त्यांच्याबरोबर रमणारे, त्यांच्यामध्ये मनापासून रस घेणारे, त्यांच्या चुकांचा समंजस स्वीकार करणारे आजी-आजोबा देखील नातवंडांना जीव की प्राण वाटतात, यात नवल करण्यासारखं काहीच नाही. परंतु आजी-आजोबांकडे आपल्या मुलांचं संगोपन सोपवताना आई-वडिलांनी आपण मुलांचे पालक आहोत हे विसरता कामा नये.
आई-बाबा होणं ही आयुष्यातली अत्यंत आनंदाची गोष्ट आहेच, पण आजी-आजोबा होणं ही त्यापुढची पायरी- दुधात साखर! आपल्या मुलांपेक्षा त्यांचं आपल्या नातवंडांवर थोडं जास्तच प्रेम असतं; परंतु यामागची मानसिकता समजून घ्यायला हवी. अनेकदा आज आजी-आजोबा असणार्‍या व्यक्ती आपल्या तरुणपणात आपल्या मुलांना वाढवताना इतरही अनेक जबाबदार्‍या पेलत असत; त्यामुळं त्यांना त्यांच्या मुलांसाठी हवा तेवढा वेळ देता आलेला नसतो. त्यांच्याशी खेळता आलेलं नसतं आणि आता या उतारवयात इतर कोणत्याही जबाबदार्‍या नसतात. त्यामुळं फक्त आपल्या समोरील लहान मुलांबरोबर त्यांना खेळायचं असतं. त्यांच्या बाललीला अनुभवायच्या असतात. त्यात त्यांना आपल्या मुलांचं बालपण दिसत असतं. ते पुन्हा अनुभवायचं असतं. त्यामुळं आजी-आजोबांना नातवंडं अधिक प्रिय असतात.

आई-वडिलांचा मोठा आधार
आजी-आजोबांना त्या चिमुकल्यावर फक्त प्रेम करायचं आहे. निखळ, शुद्ध प्रेम. अटीविना प्रेम. त्यांना शिस्त लावण्याचं, त्यांच्या पोषण-शिक्षणाची जबाबदारी आजी-आजोबांची नाही. आई-बाबा कामावर गेल्यावर आजी-आजोबांच्या देखभालीखाली बाळ वाढत असलं तरी तेवढ्यापुरतंच त्यांचं पालकत्त्व असतं. आई-बाबांचा कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी प्रवास किंवा अचानक उद्भवलेलं ऑफिसचं महत्त्वाचं काम, अशा गरजेच्या वेळी आजी-आजोबांनी बाळासाठी उपलब्ध असणं हे आई-बाबांना मोठा आधार देऊन जातं. प्रत्येक नातवंड वेगवेगळं असतं. वयानुरूप गरजाही वेगळ्या असतात. अगदी छोट्यांना दूध, खाणं, गाणी, थोपटून जोजवणं हेच हवं असतं, तर थोड्या मोठयांना खेळणी, गोष्टी, बागेत घेऊन जाणं यात मजा येते. एखाद्याला दंगामस्ती आवडेल तर दुसर्‍याला शांत बसून खेळणं आवडेल. बाळांच्या आवडीनुसार त्यांच्याबरोबर रमणारे, त्यांच्यामध्ये मनापासून रस घेणारे, त्यांच्या चुकांचा समंजस स्वीकार करणारे आजी-आजोबा नातवंडांना जीव की प्राण वाटतात, यात नवल करण्यासारखं काहीच नाही.


आजी-आजोबांच्या सहवासात मुलांची प्रगती
मुलांच्या जडण-घडणीत आजी-आजोबांचा देखील निश्चितच वाटा असतो. ज्यांना आजी-आजोबांचा सहवास मिळतो तेथील मुलांची प्रगती होते, असं एका पाहणीत आढळून आलं आहे. मैत्री आणि जिव्हाळ्याचे संबंध आणि निरपेक्ष प्रेम आजी-आजोबांकडून नातवंडांना मिळतं. पालक त्यांच्या करिअरमध्ये व्यग्र असल्याने जी मुलं आजी-आजोबांच्या सहवासात राहतात त्यांना घरातील लहानसहान कामं करण्यात आनंद मिळतो. एकमेकांना मदत करण्याची सवय होते. नात्यातील गोडवा, स्नेह, आपुलकी, प्रेमळ गप्पा यांतून त्यांचं भावविश्व समृद्ध होत जातं. लहान मुलांमध्ये स्वयंशिस्त आणि स्वावलंबीपणा येतो. मात्र सध्या वेगाने लयास चाललेली एकत्र कुटुंब पद्धती नातवंडांच्या विकासाला मारक ठरत आहे.
भारतीय कुटुंबामध्ये नातवंडं सांभाळण्यासाठी एक खात्रीशीर उपाय म्हणूनच आजी-आजोबांकडे फार पूर्वीपासूनच पाहिलं जात आहे. आजी आजोबासुद्धा पालकच असतात. शिस्तीने किंवा लाडाने का होईना ते बाळाची जरा जास्तच काळजी घेतात व प्रेम करतात. प्रसंगी स्वतःची हौसमौजदेखील बाजूला ठेवून आपल्या नातवंडांची जबाबदारी ते आनंदाने स्वीकारतात. नातवंडांवर चांगले संस्कार करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, चुका दाखवून देणं, पालन-पोषणात मदत करणं यात आजी-आजोबा म्हणून त्यांना आनंदच होत असतो.

मुलांचं संगोपन आई-वडिलांची जबाबदारी
आता मात्र, या नात्यांनाही व्यवहाराची झालर आली आहे. नातवंडांचा सांभाळ करण्यासाठी आजी-आजोबांचा वापर करून घेतला जाताना दिसत आहे. हल्ली पैशाला फार महत्त्व आलं आहे. पैशांच्या जोरावर आपण कोणतीही गोष्ट घेऊ शकतो, असं अनेकांना वाटू लागलं आहे. परंतु प्रेम, माया, आपलेपणा, संस्कार हे असे पैशाने विकत मिळत नाहीत. त्यासाठी आजी-आजोबा सदैव मदतीला हवेत. मुलांना जन्माला घालणं हे जसं आपल्याला महत्त्वाचं वाटतं, तसंच त्यांना वाढवणं, त्यांचं संगोपन करणं हीसुद्धा पूर्णपणे आपलीच जबाबदारी आहे, हे प्रत्येक आई-वडिलांनी लक्षात घ्यायला हवं. त्यात मदत लागली तर तुम्ही आजी-आजोबांना विचारू शकता; पण तेही प्रेमानंच विचारायला हवं! आजी-आजोबांनाही त्यांचं जग आहे, त्यांचं स्वातंत्र्य आहे, याचा विचार नक्की करायला हवा. उतारवयात आजी-आजोबाही हळवे झालेले असतात, त्यांनाही नातवंडांचा सहवास हवाच असतो.

वर्षानुवर्षे गेली, संसाराचा सराव झाला,
नवा कोरा कडक पोत, एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून, अवघे आयुष्य उलगडत गेले
सौभाग्य मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले

  • शांता शेळके