आई झाली तरी शरीर सुटू दिलं नाही ग बाई… बॉ...

आई झाली तरी शरीर सुटू दिलं नाही ग बाई… बॉलिवूड अभिनेत्रींच्या फिटनेसचे गुपित (Actresses Who Didn’t Gain Weight Post Motherhood)

बाळंतपण झाले की सर्वसाधारणपणे बायकांची शरीरं सुटतात. त्या जाड्या होतात. त्यांचं शरीर बेडौल होतं. बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मात्र डिलिव्हरी नंतर करिअर करायचंच असतं. त्यामुळे स्लीम आणि फिट राहणं त्यांना गरजेचं असतं. अशा आई झालेल्या, तरी पण शरीर सुटू न देता, पहिल्यासारख्याच बारीक झालेल्या या अभिनेत्री आहेत.

शिल्पा शेट्टी

अगदी चवळीच्या शेंगेसारखं शरीर राखणारी अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टीचा बोलबाला आहे. तेव्हा आई होण्यास इच्छुक असून पुढे शरीर सुटण्याची भिती ज्यांना वाटत असेल, त्यांनी शिल्पाकडून प्रेरणा घ्यावी. इतर बायकांप्रमाणेच गर्भारपणात शिल्पा शेट्टीचं देखील वजन चांगलंच वाढलं होतं. परंतु वियान या मुलाला जन्म दिल्यानंतर शिल्पाने नियमित योगाभ्यास करून आपली शरीरयष्टी पूर्वीसारखीच बारीक राखली. आताही शिल्पा लोकांना योगाचे धडे देते. तिचे यासंबंधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

करीना कपूर

आपल्या झिरो साईड फिगर वरून करीना कपूर बराच काळ चर्चेत राहिली होती. पण निसर्ग नियमानुसार गर्भारपणी ती चांगलीच जाडी झाली होती. मात्र तैमूरला जन्म दिल्यानंतर करीनाने आपल्या फिटनेसची खूप काळजी घेतली. अन्‌ पूर्वीसारखीच फिट व स्लीम होऊन सगळ्यांना चकित करून टाकलं. आपला फिटनेस राखण्यासाठी करीना नियमितपणे व्यायाम आणि योग करते अन्‌ घरच्या खाण्यास पसंती देते.

मंदिरा बेदी

मंदिरा बेदी ही अशी अभिनेत्री आहे, जी वाढत्या वयानुसार शरीराने सुटण्याऐवजी दिवसेंदिवस जास्तच फिट आणि स्लीम दिसते आहे. फिटनेस प्रेमी असल्याची तिची ख्याती आहे. दिवस गेले असताना, सुटलेलं शरीर तिने सुटका झाल्यानंतर पुनःश्च आकारात आणलं. मंदिराचे फिटनेस व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूपच आवडतात. कित्येक जणी ते व्हिडिओ पाहून सराव करतात.

सोहा अली खान

सोहा सध्या ॲक्टिंग करताना दिसत नसली तरी सोशल मीडियावर तिचे स्लीम आणि फिट आई असल्याचे फोटो प्रसिद्ध होत राहतात. तिनं सुद्धा बाळंतपणानंतर चांगली काळजी घेत शरीराचा घेर वाढू दिला नाही. तिचा चेहरा आजही पूर्वीसारखाच निरागस आहे आणि ती आधीसारखीच फिट दिसते आहे.

ऐश्वर्या राय बच्चन

सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चनने आपली सुंदरता आणि सुडौलता राखून ठेवली आहे. गर्भारपणात आणि बाळंतपणानंतर काही काळ ती जाडेपणामुळे ट्रोल झाली होती. पण तिकडे दुर्लक्ष करून तिने आपली मुलगी आराध्या हिच्याकडे पूर्णवेळ लक्ष दिलं. आणि मग स्वतःकडे लक्ष केंद्रित करून पूर्वीसारखी सुडौल शरीरयष्टी राखली.

करिश्मा कपूर

आपली बहीण करीना कपूर हिच्याप्रमाणेच करिश्मा कपूर आपल्या फिटनेसकडे लक्ष देते. नव्वदीच्या दशकात करिश्माने सिनेसृष्टीत चांगलं नाव कमावलं होतं. लग्नानंतर तिने मुलांच्या संगोपनात मन गुंतवलं, म्हणून सिनेसृष्टीपासून दूर झाली. पण ती जेव्हा कधी सोशल मीडियावर अवतरते तेव्हा तिचा फिटनेस पाहून लोक अचंबित होतात. दोन मुलांची आई झाली, तरी आपला फिटनेस ती व्यवस्थित राखून आहे. संतुलित आहाराकडे तिचा कल असतो.

राणी मुखर्जी

वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि वेगळे अभिनय गुण लाभलेली राणी मुखर्जी बॉलिवूडमध्ये अजूनही टिकून आहे. ‘मर्दानी’ सारख्या निवडक चित्रपटातून ती आपली चमक दाखवते. दिग्दर्शक आदित्य चोप्राशी राणीने लग्न केले. अन्‌ आदिराला जन्म दिला. गर्भारपणी तिचे वजन वाढले होतेच. पण बाळंत झाल्यानंतर तिने स्वतःला पूर्वीप्रमाणेच स्लीम बनविले.

काजोल

काल परवाच सफरचंदाची ॲक्शन करून काजोल ट्रोल झाली होती. पण तिने मनावर घेतले नाही. ती आहेच तशी. खासगी आयुष्य असो की सिनेमाची निवड, ती आपल्या मनानेच निर्णय घेते. न्यासा आणि युग अशा दोन मुलांची ती आई झाली. अन्‌ त्यांच्या संगोपनासाठी फिल्मलाईनपासून अंतर राखले. त्यांचे संगोपन करत असतानाच काजोलने आपल्या फिगरचेही संवर्धन केले. त्याचा परिणाम म्हणूनच दोन मुलांची आई असलेली काजोल फिट दिसते.