लहान मुलांच्या सुरक्षा मोहिमेत, अभिनेत्री टिस्क...
लहान मुलांच्या सुरक्षा मोहिमेत, अभिनेत्री टिस्का चोप्राचा ‘मेटा’शी सहयोग (Actress Tisca Chopra Collaborates With ‘META’ On Child Safely Compaign)

अभिनेत्री टिस्का चोप्रा हिने ‘हेल्प प्रोटेक्ट चिल्ड्रेन. डोन्ट शेअर. डोन्ट कमेन्ट. रिपोर्ट’ या डिजिटल सुरक्षा मोहिमेत सहयोग दिला आहे. ‘मेटा’च्या वतीने सदर मोहीम राबवण्यात येत असून लहान मुलांशी लैंगिक दुर्वर्तन करण्यासंबंधीचा मजकूर प्रसारित करण्याच्या विरोधात ही मोहीम चालविण्यात येत आहे.
असे दुर्वर्तन प्रसारित करण्यापेक्षा, त्याला प्रतिबंध केला पाहिजे व त्याची दखल घेणाऱ्यांकडे सदर माहिती पुरवली पाहिजे; या संबंधी या मोहिमेत भर देण्यात येत आहे. असा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याने होणारे दुष्परिणाम व बालकांवर ओढविणारी आपत्ती याबाबत दर्शकांना प्रशिक्षित केले जात आहे.

दुर्वर्तनाचे अपायकारक व्हिडिओ, छायाचित्रे यांना पायबंद घालण्याची व त्यापासून मुलांचा बचाव करण्यासाठी त्याची माहिती फेसबुक वरुन द्यावी, अशी विचारसरणी या मोहिमेमागे आहे.
“लहान मुले सोशल मिडिया वापराचा अतिरेक करत असल्याने, सध्याच्या काळात त्यांच्या ऑनलाईन विहारात रोजच्या रोज लक्ष घालणे, पालकांना कठीण जात आहे,” असं सांगून टिस्का चोप्रा म्हणते, “पालकांनी आपल्या मुलांशी निकोप सुसंवाद वाढवावा. त्यामध्ये स्वतःच्या सुरक्षेसाठी कोणती काळजी घ्यावी, या बाबत मुलांना अवगत करावे.”

“लैंगिक दुर्वर्तनाबाबतचे साहित्य हे कोणाचे नुकसान करण्यासाठी प्रसिद्ध केलेले नसले तरी त्याचा परिणाम सहभागी मुलांवर काय होऊ शकतो, याबाबत युजर्सना जागरूक करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. अशा अयोग्य कन्टेन्टची माहिती पुरवून आपल्या मुलांना त्यापासून सुरक्षित कसे ठेवावे, याबाबत युजर्सना शिक्षण देण्याचे काम या मोहिमेतून साध्य होईल,” अशी भुमिका फेसबुक इंडिया (मेटा)च्या इन्स्टाग्राम आणि पॉलिसी प्रोग्रॅमच्या प्रमुख नताशा जोग यांनी टिस्काशी संवाद साधताना स्पष्ट केली.