अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लग्नगाठ बांधली (Act...

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लग्नगाठ बांधली (Actress Sonali Kulkarni Ties The Knot)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली. ७ मे रोजी दुबईत साध्या पद्धतीने सोनालीचा विवाह सोहळा पार पडला. सोनालीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

कुणालचं कुटुंब तसेच मित्र अमेरिकेला असल्यामुळे खरं तर तेथेच जूनमध्ये लग्न करण्याचं ठरलं होतं. पण तिथे आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तारीख जुलैमध्ये करावी लागली. बरं लग्नाच्या तयारीसाठी मार्चमध्ये शूटिंग संपवून सोनाली दुबईला गेली अन्‌ भारतात दुसरी लाट आली. त्यामुळे ती पुन्हा दुबईत अडकली अन्‌ … लग्नबंधनात ही! दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने त्यांनी हा लग्नसोहळा पार पाडला.

जगभरातील एकंदर परिस्थिती पाहता कुठलंही सेलिब्रेशन न करता आई-बाबांचा होकार मिळवून, ‘दोन दिवसांत सगळं ठरवलं. एका तासात खरेदी आणि १५ मिनिटांमध्ये चार लोकांच्या साक्षीने मंदिरात (इथे कोव्हिड निर्बंधांमुळे तेवढंच शक्य आहे) वरमाळा, मंगळसूत्र, कुंकू केवळ या ३ गोष्टी करून (लग्नाच्या मान्यतेसाठी मंदिराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधी) मॅरेज सर्टिफिकेटवर स्वाक्षरी केली’ अशी पोस्ट सोनालीने लग्नाचे फोटो शेअर करताना लिहिली.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. सोनालीच्या परिवाराने या सोहळ्याला ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावल्याचंही तिने शेअर केलेल्या फोटोंमधून दिसत आहे.

सोनालीवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सोनाली आणि कुणालच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दुबईतच सोनाली आणि कुणालचा साखरपुडा पार पडला होता.

(फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी / इन्स्टाग्राम)