सोनाली कुलकर्णी – कुणाल यांच्या लग्नाचा भव्य सो...

सोनाली कुलकर्णी – कुणाल यांच्या लग्नाचा भव्य सोहळा ओटीटी मंचावर (Actress Sonali Kulkarni And Kunal’s Grand Wedding Ceremony To Be Telecast On OTT Platform)

लग्न म्हणजे अनमोल क्षणांची तिजोरी. त्याला आपले कलाकार ही अपवाद नाहीत. या कलाकारांचा लग्नसोहळा कसा साजरा केला जातो, त्यांनी लग्नात कोणते कपडे घातले असतील, काय दागिने घातले होते, जेवणाची पंगत कशी रचली होती, त्यांनी किती धमाल केली असेल अशा अनेक गोष्टी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. चाहत्यांची हिच उत्सुकता लक्षात घेऊन ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर महाराष्ट्राची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा भव्य विवाह सोहळा पाहता येणार आहे. नुकतेच या सोहळ्याचे निमंत्रण प्रेक्षकांना सोशल मीडियाद्वारे देण्यात आले. त्यामुळे लवकरच आता चाहत्यांना सोनालीच्या आयुष्यातील सुवर्णक्षणांचा साक्षीदार होता येणार आहे.

एखाद्या मराठी कलाकाराच्या विवाह सोहळ्याचे ओटीटीवर प्रक्षेपण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यात उपस्थितांना सोनाली आणि कुणाल यांचा लंडनमध्ये पार पडलेला संपूर्ण लग्नसोहळा, वऱ्हाडींची धुमधाम, लग्नातील विधी हे सर्व पाहाता येणार आहे.

सोनाली कुलकर्णी म्हणते, ” ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ वर पहिल्यांदाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्याचे प्रक्षेपण केले जात आहे. ज्यांना माझ्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहाता आले नाही त्यांना आणि माझ्या जगभरातील चाहत्यांना माझ्या आयुष्यातील हा सर्वात आनंददायी क्षण अनुभवायला मिळेल. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ माझ्या चाहत्यांपर्यंत माझे लग्न पोहोचवत आहे, ही गोष्ट माझ्यासाठी खूपच आनंददायी आहे.”

‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “कलाकार आणि त्यांचे चाहते यांच नातं आगळंवेगळंच असतं आणि त्यात जर आपल्या लाडक्या कलाकारांचे लग्न असेल तर चाहत्यांची उत्सुकता वेगळ्याच लेव्हलला असते. त्यात सोनालीने तर सातासमुद्रापार लग्न केले तेही अगदी मराठमोळ्या पद्धतीने, ज्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्यात तिचे लग्नातील फोटोही कुठे झळकले नाहीत. त्यामुळे सगळ्यांनाच सोनाली आणि कुणालचा विवाह कसा संपन्न झाला याची उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे हा लग्न सोहळा प्रेक्षकांपर्यंत पोहचवून त्यांना खूश करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. सोनालीच्या चाहत्यांसाठी ही तर पर्वणीच म्हणावी लागेल. सर्व प्रेक्षकांना लवकरच फक्त प्लॅनेट मराठी ओटीटीवर सोनालीच्या लग्नाला हजर राहण्याची संधी मिळणार आहे.’’