आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेसाठी समृद्धी केळकरची...

आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेसाठी समृद्धी केळकरची फिटनेस व स्टॅमिनावर मेहनत (Actress Samrudhi Kelkar Takes Pains For Fitness And Stamina To Play The Role Of IPS Officer)

स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेत कीर्तीचा स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरु झाला आहे. आयपीएस ऑफिसर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या कीर्तीला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. मात्र अखेर जिजी अक्कानी होकार दिल्यानंतर कीर्तीच्या आयुष्याला आता नवी कलाटणी मिळणार आहे.

आयपीएस ऑफिसर बनण्याचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नाहीय. यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटी लागणार आहे. कीर्तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकरसाठी हे नवं आव्हान असणार आहे. मालिकेतल्या या महत्वपूर्ण वळणाबद्दल सांगताना समृद्धी म्हणाली, ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ या तुकाराम महाराजांच्या ओळी मला आठवतात. मालिकेच्या पहिल्या दिवसापासून कीर्तीच्या आयपीएस ऑफिसर बनण्याच्या स्वप्नाचे प्रेक्षक साक्षीदार आहेत.

“कीर्तीसाठी हे आव्हानात्मक असेलच पण समृद्धी म्हणून माझी कसोटी लागणार आहे. मी फारशी फिटनेस फ्रीक नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून मी माझ्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतेय. या संपूर्ण प्रवासात स्टॅमिना महत्वाचा आहे. तो स्टॅमिना वाढवण्यासाठी योग्य आहाराकडे आणि व्यायामाकडे मी विशेष लक्ष देतेय. याआधी बॉडी डबल न वापरता मी मालिकेत स्टंट सिकवेन्स केले आहेत. त्यामुळे या पुढच्या खडतर प्रवासासाठी माझी तयारी सुरू झालीय. मला लहानपणापासूनच खाकी वर्दी विषयी प्रेम आणि आदर आहे. या मालिकेच्या निमित्ताने हे सगळं अनुभवायला मिळत आहे याचा आनंद आहे. समृद्धी म्हणून हे शिवधनुष्य पेलण्याचा मी प्रयत्न करणार आहे.” असे समृद्धीने म्हटले आहे.