सायरा बानो यांची प्रकृती खालावली, त्यांना आयसीय...

सायरा बानो यांची प्रकृती खालावली, त्यांना आयसीयूमध्ये ठेवलं आहे… (Actress Saira Banu Hospitalised, Shifted To ICU)

काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं होतं. दिलीपजींच्या आजारपणात सायरा बानो यांनी दिलीपजींची खूप सेवा केली. परंतु त्यांच्या निधनानंतर त्या स्वतःला अजूनही सावरू शकलेल्या नाहीत. दिलीपजींच्या आठवणीने त्या नेहमीच भावूक होतात.

 आता अचानक त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळत आहे. सायरा बानो यांना प्रकृती ठीक नसल्याने तीन दिवसांपूर्वी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने इस्पितळात भरती करण्यात आलं आहे. सायरा यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली असून त्यांचा रक्तदाब सामान्य होत नसल्याने त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत.

Saira Banu Hospitalised

सायरा यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, सायरा यांना दिलीप कुमार यांच्या जाण्याचा मोठा धक्का बसला होता. अजूनही त्या दिलीपजी हयात नाहीत हे मान्य करण्यास तयार होत नाहीत. सायरा यांचं दिलीप कुमार यांच्यावर असलेलं प्रेम सर्वश्रुत आहे. दिलीप कुमार यांचं ७ जुलै २०२१ रोजी निधन झालं होतं. सायरा दिलीप कुमार यांना आपलं संपूर्ण जग मानत होत्या. दिलीप कुमार यांच्या मृत्यूनंतर सायरा कोणासोबतही बोलत नव्हत्या किंवा कुणालाही भेटत नव्हत्या.

सायरा यांची प्रकृती गंभीर असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. सायरा या त्या काळातील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक होत्या. सायरा यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. वयाच्या १२ व्या वर्षापासूनच सायरा यांना दिलीप कुमार आवडत होते. सायरा आणि दिलीप कुमार यांच्या वयात बरंच अंतर असतानाही सायरा यांनी अखेरपर्यंत दिलीप कुमार यांना साथ दिली. आता त्यांच्या मृत्यूनंतर मात्र सायरा खचून गेल्याने त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर दिसू लागला आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम / सोशल मीडिया