अभिनेत्री कुंजिका काळविंट झाली आहे ‘शुभविवाह’ची...

अभिनेत्री कुंजिका काळविंट झाली आहे ‘शुभविवाह’ची खलनायिका (Actress Kunjika Kalvint Portrays Vamp In New Serial ‘Shubh Vivah’)

आगळे नाव आणि वेगळे आडनाव असलेली अभिनेत्री कुंजिका काळविंट, स्टार प्रवाहच्या ‘शुभविवाह’ या नव्या मालिकेत खलनायिकेची भूमिका करत आहे. बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या नायिकेच्या त्यागाची गोष्ट या मालिकेत दिसणार आहे. नायिकेची भूमिका मधुरा देशपांडे करत आहे.

या नायिकेच्या सावत्र बहिणीची म्हणजेच पौर्णिमा ही व्यक्तीरेखा कुंजिका साकारत आहे. त्याबद्दल ती म्हणते, “मी गेले वर्षभर एका चांगल्या कथानकाच्या व चांगल्या पात्राच्या शोधात होते. शुभविवाह ही मालिका म्हणजे माझी स्वप्नपूर्ती म्हणता येईल. खलनायिकेची नकारात्मक भूमिका करताना खूप कस लागतो. शिवाय मालिकेत ही खलनायिका पुढे काय काय कारस्थाने करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता असते.”

पडद्यावर भूमी आणि पौर्णिमा या सावत्र बहिणी आहेत. त्यामुळे त्यांचं पटत नसलं तरी पडद्यामागे आमची छान गट्टी जमली आहे, असं कुंजिका सांगते. रुम शेअर करण्यापासून ते एकमेकींची मते जाणून घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्या दोघी आपलेपणाने करतात. “या मालिकेमुळे मधुरा देशपांडे ही एक छान मैत्रीण मला मिळाली आहे,” असे कुंजिका सांगते.

‘शुभविवाह’ ही मालिका येत्या १६ जानेवारी पासून दुपारी २ वाजता प्रक्षेपित होणार आहे.