‘द गुड वाईफ’ मधील काजोलचा फर्स्ट लूक आऊट (Actre...

‘द गुड वाईफ’ मधील काजोलचा फर्स्ट लूक आऊट (Actress Kajol’s ‘The Good Wife’ first look out)

बॉलिवूड अभिनेत्री काजोलनं एकेकाळी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टी गाजवली आहे. आजही काजोलचा अभिनय तेवढाच दमदार आहे. चित्रपटांनंतर आता काजोल लवकरच वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. नुकताच तिचा वेब सिरीजचा टीझर प्रदर्शित झाला असून काजोलचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

‘डिस्नी प्लस हॉटस्टार’च्या ‘द गुड वाईफ : प्यार, कानून, धोका’ (The Good Wife- Pyaar, Kanoon, Dhoka) या सिरीजमधून ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. काजोलने जुलैमध्ये एका व्हिडिओच्या माध्यमातून या नव्या वेब सिरीजची घोषणा केली होती. तर नुकताच तिने या वेब सिरीजमधील तिचा फर्स्ट लूक दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. मुख्य म्हणजे या वेब सिरीजमध्ये ती आपल्याला एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. या व्हिडीओत ती एका वकिलाचा लूकमध्ये ऑफिसला जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “सुरुवात करूया?”

ही वेब सिरीज लोकप्रिय अमेरिकन कार्यक्रम ‘द गुड वाईफ’चा रिमेक आहे. हा मूळ कार्यक्रम सीबीएस स्टुडिओने तयार केला होता, जो २००९-२०१६ मध्ये प्रसारित केला गेला होता. अभिनेत्री जुलियाना मार्गुलीजने त्यात मुख्य भूमिका साकारली होती. तर काजोलच्या ‘द गुड वाईफ : प्यार, कानून, धोका’ या सिरीजचे दिग्दर्शन सुपर्ण वर्मा करत आहेत आणि बनजय एशिया यांची निर्मिती आहे.

काजोल या सिरीजच्या माध्यमातून ओटीटीत पदार्पण करण्यासाठी उत्सुक आहे. ती म्हणाली, “माझ्या संपूर्ण अभिनय प्रवासात मी अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, पण पहिली भूमिका नेहमीच खास असते. ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे निर्माते आणि कलाकार यांना नवनवीन प्रयोग करण्याची संधी मिळते आणि हिच या माध्यमाची खासियत आहे. माझ्या पहिल्या चित्रपटात मी वकिलाची भूमिका साकारली होती आणि योगायोग म्हणजे पहिल्या वेब सिरीजमध्येही माझी वकिलाचीच भूमिका आहे. त्यामुळे मी फार खुश आहे.”

सध्या या सिरीजचे चित्रीकरण सुरु आहे. या वर्षाच्या अखेरीस ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असे बोलले जात आहे.