अभिनेत्री अदिती सारंगधरने मुलाच्या ‘नो स्क्रीन ...

अभिनेत्री अदिती सारंगधरने मुलाच्या ‘नो स्क्रीन टाईम’साठी लढवली भन्नाट शक्कल (Actress Aditi Sarangdhar Creates New Idea For ‘No Screen Time’ Of Her Son)

पूर्वी वेळ मिळाला की मुलं मैदानी खेळ खेळायचे किंवा इतर कोणतेही बैठे खेळ खेळून स्वत:चा वेळ घालवायचे. पण काळ जसजसा बदलत गेला तसा या खेळांची जागा मोबाईल आणि टीव्हीने घेतली. आजकालची मुलं सतत टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम यांसारख्या गोष्टीत गुंतलेली असतात. त्यामुळे त्यांचा सर्वागिण विकास कुठेतरी खुंटला आहे तसेच त्यांच्या डोळ्यांवरही त्याचा वाईट परिणाम होत आहे अशी तक्रार प्रत्येक पालकांची असते. या सगळ्यांवर मात्र अभिनेत्री अदिती सारंगधरने एक नामी शक्कल लढवली आहे.

काही महिन्यांपूर्वी झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील मालविका हे पात्र साकारणाऱ्या अदिती सारंगधरने ती तिच्या मुलासोबत कशी वेळ घालवते याबद्दल एका मुलाखतीत सांगितले. अदितीला एक 6 वर्षांचा मुलगा आहे. सध्या सतत वापरात येणारे मोबाईल टीव्ही यांची सवय अदितीच्या मुलालाही लागली होती. पण तिने यावर एक कल्पना शोधली आणि मुलाला स्क्रीन टाइमपासून दूर ठेवले.

अदितीने सांगितले की,’’ माझ्या मुलाचा स्क्रीन टाइम कमी व्हावा यासाठी मी आधी त्याला फिरायला घेऊन जाऊ लागले पण तिथे त्याला कंटाळा येऊ लागला. म्हणून मी वेगवेगळ्या रंगाचे प्लेन टीशर्ट  आणि काही अॅक्रेलिक रंग मागवले. माझ्या मुलाला मी त्या टीशर्टवर त्याला हवं ते चित्र  किंवा डिझाइन काढायला देते. त्यानंतर मी ते टीशर्ट तसेच ठेवत नाही किंवा टाकूनही देत नाही. माझ्या मुलाने रंगवलेले टीशर्ट मी रोजच्या वापरात घालते. तसेच कुठे बाहेर जायचे असेल तेव्हा सुद्धा मी ते घालते. माझ्या मुलाला त्याच्या चित्रांचा कमीपणा वाटू नये तसेच त्याला त्याच्या कलेविषयी आपुलकी वाटावी यासाठी मी ते टीशर्ट कौतुकाने घालून मिरवते. सध्या मी ‘न्यू एज पॅरेंटिंग फंडा’ स्विकारण्याचा प्रयत्न करत आहे असे’’ अदिती म्हणाली.

अदितीची ही भन्नाट कल्पना अनेक पालकांना आवडली असून अनेकजण तिचे कौतुक करत आहेत.