अलबत्या गलबत्या नाटकाला वैभव मांगलेचा रामराम...

अलबत्या गलबत्या नाटकाला वैभव मांगलेचा रामराम…आता नवी चेटकीण कोण ? (Actor Vaibhav Mangale Makes Good Bye To Popular Marathi Play ‘Albatya Galbatya’: Know Who Plays The Role Of New Witch)

सध्या रंगभूमीवर वेगवेगळ्या प्रकारची नाटके मोठ्याप्रमाणावर सुरु आहेत. अशातच खास लहानमुलांसाठी असलेल्या अलबत्या गलबत्या या नाटकाला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकातली चिंचि चेटकीण लहानग्यांना खूप आवडते. नाटकाच्या सुरुवातीला चिंचि चेटकिणीला घाबरणारी लहान मुलं नाटकाच्या अंती तिच्यात अगदी समरसून जातात. अलबत्या गलबत्या या नाटकात चिंचि चेटकीणीची भूमिका वैभव मांगलेने साकारली आहे. पण आता वैभव मांगलेने हे नाटक सोडल्याचे समोर आले आहे. वैभव मांगलेने हे नाटक सोडल्यामुळे प्रेक्षकांमध्ये सुद्धा नाराजीचे सूर दिसत आहेत.

अभिनेता वैभव मांगले सध्या डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमातसुद्धा चिंचि चेटकीण हे पात्र साकारत आहे. पण ज्या नाटकामुळे त्याने हे पात्र साकारण्यास सुरुवात केली तेच नाटक आता वैभवने सोडले आहे. नाटकाचे निर्माते राहुल भंडारे यांच्याशी काही मतभेद झाल्यामुळे वैभवने हे नाटक सोडल्याचे म्हटले जाते. याशिवाय त्याची सोशल मीडियावरची एक पोस्ट सुद्धा चर्चेत आली आहे.

या पोस्टमध्ये वैभवने लिहिले होते कि, ‘प्रिय रसिक प्रेक्षक आणि बालमित्रांनो मैत्रिणींनो मी चिंचि चेटकीणीचं काम सोडलं आहे. तरी जाहिरातीतला फोटो माझा आहे असे वाटून कदाचित माझी चेटकीण पहायला याल आणि भ्रमनिरास होईल. तर सांगायचा मुद्दा हा आहे की, ‘ती मी नाहीच. या पोस्टनंतर विविध चर्चांना उधाण आले आहे.

पण वैभव आणि राहुल यांच्यात वाद चालले आहेत या चर्चांना त्या दोघांकडून कोणतेही प्रतिउत्तर आलेले नाही. माहितीनुसार, निर्मात्यांनी हे नाटक पुढे चालवण्यासाठी वैभव मांगले यांनी साकारलेल्या चिंची चेटकीण या पात्रासाठी नवा अभिनेता शोधून काढला आहे. या नव्या चिंचि चेटकिणीचे नाव अभिनेता निलेश गोपनारायण असे आहे. नीलेशचे हे पहिलेच व्यावसायिक नाटक असून तो थेट वैभव यांच्या पात्राची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. या नव्या चेटकीणीला प्रेक्षक स्विकारतील का हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरेल.