सिद्धार्थ चांदेकरला त्याच्या नव्या घरात येतेय ‘...
सिद्धार्थ चांदेकरला त्याच्या नव्या घरात येतेय ‘तिची’ आठवण ( Actor Siddharth Chandekar Shifted To His New Home , But Misses ‘Her’ A Lot : Who Is ‘She’ ?)

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी जानेवारी 2021 मध्ये एकमेकांशी विवाहगाठ बांधली. ही जोडी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आवडतात.

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आणि मितालीने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन आपले मुंबईत हक्काचे घर घेतल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांचे अभिनंदन केले होते.
आता पुन्हा एकदा सिद्धार्थने शेअर केलेली त्याच्या नव्या घराची पोस्ट व्हायरल होत आहे. सिद्धार्थ आणि मिताली नुकतेच आपल्या नव्या घरात राहायला गेले.

पण नव्या घरात जाताना सिद्धार्थला त्याच्या ‘’तिला’’ सोबत घेऊन जाता न आल्यामुळे तो दु:खी आहे. सिद्धार्थची त्याच्या ‘’तिच्या’’बद्दलची भावनिक पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे.

सिद्धार्थच्या जुन्या घरातील ‘’ती’’ म्हणजे त्याची लाडकी खिडकी. सिद्धार्थचे त्याच्या जुन्या घरातल्या खिडकीसोबत खूप भावनिक नाते होते. त्यामुळे नव्या घरात ती सोबत नसणार या विचाराने तो खूप भावूक झाला आहे. खिडकीसाठी एक पोस्ट टाकत त्याने म्हटले की, ‘तुला सोबत घेऊन जाता येणं शक्य नाही म्हणून, नाहीतर एका छोट्या पोतडीत बांधून कायमचं घेऊन गेलो असतो. किती काय काय पाहिलंयस तू. किती काय काय दाखवलंयस तू. किती लोक, किती प्रेम, किती भांडणं, किती अडचणी, किती आनंद. कित्ती कित्ती आठवणी. स्वप्नात येशील तेव्हा तुझ्याच एका कोपऱ्यात एका भिंतीला डोकं टेकवून बसेन. तुझ्या रंगावरून, फरशीवरून हात फिरवेन. मुटकुळं करून तुझ्या खिडकीशी झोपून जाईन. तेव्हापण असंच थोपट.. जसं इतकी वर्ष केलंस. तुझा वास, तुझी धूळ, मुठीत घट्ट पकडून नेतोय. ज्या नवीन घरात चाललोय त्याला तुझ्या गोष्टी सांगेन. तुझ्या सारखं मिठी मारायला शिकवेन. आमच्यानंतर जे येतील त्यांना असंच प्रेम दे. पण आम्हाला विसरू नकोस. नीट राहा. नीट राहू दे.’
सिद्धार्थची ही भावनिक पोस्ट वाचून अनेकांना वाईट वाटल्याचे कमेंटमधून दिसते. तर काहींनी सिद्धार्थला नव्या घरातल्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.