प्रसिद्ध अभिनेते सतिश कौशिक यांचं हृदयविकाराच्य...

प्रसिद्ध अभिनेते सतिश कौशिक यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन; त्यांचे शेवटचे ट्विट सोशल मीडियावर होतंय व्हायरल… (Actor Satish Kaushik Death, His Last Tweet About Celebrate Holi And Fun Goes Viral On Social Media)

अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश यांचे खास मित्र आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत निधनाची माहिती दिली. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये खेर म्हणतात, “मला माहित आहे मृत्यू हेच या जगाचं अंतिम सत्य आहे. पण ही गोष्ट मी माझा जवळचा मित्र सतिश कौशिकसाठी लिहीन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. ४५ वर्षांच्या मैत्रीवर हा असा अचानक पूर्णविराम. सतिश, तुझ्याशिवाय आयुष्य पहिल्यासारखं नक्कीच राहणार नाही.”

सतीश कौशिक यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. कारण सतत हसणारे आणि हसवणारे सतीश कौशिक यांची अचानक एक्झिट सगळ्यांच्याच जिव्हारी लागली आहे. सतीश यांनी कायम आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांना हसवले. खऱ्या आयुष्यातही ते तितकेच आनंदी असायचे. त्यामुळे मनोरंजन विश्वात त्यांची एक वेगळीच प्रतिमा होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते आनंदी होते. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांची सोशल मीडियावरील अखेरची पोस्ट व्हायरल होत आहे. ७ मार्च रोजी म्हणजेच दोन दिवसांपूर्वी त्यांनी ही पोस्ट अपलोड केली होती.

इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांसोबत ते यामध्ये मनमुराद होळी खेळताना दिसले.यावेळी त्यांनी रंगपंचमीचा तूफान आनंद लुटला. सोबत हे फोटो शेयर करत एक ट्विटही केले. त्यांनी आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये होळीच्या शुभेच्छा देत लिहलंय की, ‘हा.. रंगाचा, आनंदाचा सण, जावेद अख्तर यांची होळी पार्टी…’ सोबतच.. ‘भेटा या नवविवाहीत जोडप्याला’ म्हणत अली फझल आणि रिचा चड्ढा यांच्यासोबतही त्यांनी फोटो पोस्ट केला होता. त्यांचं हे ट्विट आता व्हायरल होत आहे.

केवळ अभिनयच नव्हेत तर लेखक, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिका कौशिक यांनी वठवल्या आहेत. त्यांचा जन्म १३ एप्रिल १९६५ रोजी हरियाणा इथे झाला. बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्यांनी अनेक नाटकांत काम केलं. १९८७ मध्ये मिस्टर इंडिया या चित्रपटामध्ये कॅलेंडर या भूमिकेतून त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. सतीश कौशिक यांनी आपल्या ४ दशकांच्या कारकिर्दीत जवळपास १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १९९३ मध्ये त्यांनी ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. आत्तापर्यंत त्यांनी वीसहून अधिक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

सतीश कौशिक यांच्या निधनाचं कारण नुकतंच समोर आलं आहे. एनसीआरमध्ये असताना सतीश कौशिक यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. त्यांचं पार्थिव सध्या गुरुग्राममधील फोर्टीज रुग्णालयात आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचं पार्शिव मुंबईत आणलं जाईल. गुरुग्राममध्ये ते कोणाला तरी भेटण्यासाठी गेले होते, मात्र कारमध्येच त्यांना हार्ट अटॅक आला.