सैफ अली खानने घेतला वॅक्सिन डोस (Actor Saif Ali...

सैफ अली खानने घेतला वॅक्सिन डोस (Actor Saif Ali Khan Takes Jab Of Covid-19 Vaccine, Video Goes Viral)

कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर कोविड – १९ लसीकणाचं काम वेगानं सुरु झालं आहे. डॉक्टर, नर्सेस यांनंतर आता चित्रपटसृष्टीतील कलाकारही लसीकरण करून घेऊ लागले आहेत. साउथ सुपर स्टार कमल हसन आणि सतीश शाह यांच्या मागोमाग अभिनेता सैफ अली खानने कोरोना-१९ च्या लशीचा पहिला डोस घेतला आहे. मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवारी ५० वर्षीय सैफने कोरोना-१९ च्या लशीचा पहिला डोस घेतला आहे. सैफचा लसीकरणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओ क्रेडिट: विरल भयानी

कोविड-१९ लसीकरणाकरीता बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे गेलेल्या सैफचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सैफ लसीकरणानंतर आपल्या गाडीकडे येताना दिसत आहे. खाकी रंगाची पँट आणि निळ्या रंगाचा कुर्ता अशा कॅज्युअल ड्रेसमध्ये तो दिसत असून त्याने तोंडाला मास्कऐवजी लाल रंगाचा कपडा बांधला आहे.

सैफ अली खान हा मोठा अभिनेता असला तरीही बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील लसीकरण केंद्रामध्ये जाऊन सैफने रांगेत उभे राहून सामान्य नागरिकाप्रमाणे कोरोनाची लस लावून घेतली असल्याचे सूत्रांकडून समजते.

सैफ अली खान सोशल मीडियावर नाही आहे. पण कमल हसन आणि सतीश शाह, या दोघांनी कोविड-१९ लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर आपला अनुभव ट्वीटरवर शेअर केला. अभिनेता सतीश शहा यांनी सांगितले की , कोविड-१९ लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर तीन तास ते उन्हात उभे होते.

कमल हसनने देखील सगळ्यांना आग्रहाचा सल्ला दिला आहे की, प्रत्येक नागरिकाने न घाबरता कोविड-१९ लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. मी श्री रामचंद्र हॉस्पिटलमध्ये लशीचा पहिला डोस घेतला आहे. आज शरीराचे लसीकरण आणि पुढच्या महिन्यात भ्रष्टाचाराविरुध्दच्या लसीकरणासाठी तयार राहा, असंही त्याने म्हटलं आहे

सेंट्रल गर्व्हमेंटने मागच्या आठवड्यात असे जाहिर केले आहे की, १ मार्चपासून ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती आणि ४५ वर्षांहून अधिक वयाच्या कोणताही आजार असणाऱ्या व्यक्तींना सरकारी इस्पितळांमध्ये मोफत आणि खाजगी इस्पितळांमध्ये सशुल्क कोविड-१९ च्या लसीकरणाची सेवा उपलब्ध होणार आहे.

मागच्याच महिन्यात सैफ-करिनाने आपल्या दुसऱ्या नवाबाचे स्वागत केले आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या हितचिंतकांचे दोघांनी आभार मानले होते. बाळंतपणानंतर बऱ्याच दिवसांनी करिनाही सोशल मीडियावर दिसली होती. आणि आता लसीकरणाच्या निमित्ताने बाहेर पडलेला सैफचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सैफच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं तर तो, बंटी और बबली २, भूत पुलिस आणि आदिपुरुष अशा चित्रपटांतून आपणांस दिसणार आहे.