सुपरिचीत मल्याळम अभिनेता विजय बाबूवर कोझिकोडच्य...

सुपरिचीत मल्याळम अभिनेता विजय बाबूवर कोझिकोडच्या एका महिलेचा बलात्काराचा आरोप, तिला न्याय मिळेल की अभिनेत्यास मिळेल विजय…? (Actor – Producer Vijay Babu Faces Police Interrogation For The Charges Of Rape)

मल्याळम अभिनेता/निर्माता, विजय बाबू, (Vijay Babu) काल बुधवार, १ जून रोजी दुबईहून परतला आहे. त्याच्यावर दाखल केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या (Charges Of Rape) खटल्याच्या संदर्भात चौकशीसाठी केरळ पोलिसांना तो हवा असून त्याला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर करण्यात आल्याची माहिती आहे.

विजयबाबू हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील मोठे प्रस्थ आहे. आपल्या करिअरमध्ये त्याने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. अभिनयासोबतच तो निर्माताही आहे. फ्राईडे फिल्म नावाचं त्याचं प्रॉडक्शन हाऊस आहे. परंतु महिन्याभरापूर्वी या विजयबाबूंच्या बाबतीत नाव मोठं आणि लक्षण खोटं अशाप्रकारची बातमी समोर आली होती.

कोझिकोड येथे राहणाऱ्या एका पीडित महिलेने विजय बाबूंवर चक्क बलात्कार केल्याचा आरोप केला. चित्रपटांमध्ये काम देण्याच्या आमिषाने विजय बाबूने लैंगिक शोषण केल्याचा त्या महिलेचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अभिनेत्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे.

या महिलेने आपल्या तक्रारीमध्ये पुढे असे म्हटले आहे की, इंडस्ट्रीत नवीन असताना विजयबाबूने आधी आपल्याशी मैत्री केली, नंतर मैत्रीच्या नावाखाली लैंगिक शोषण केले. एवढेच नाही तर, शरीरसंबंधांना नकार दिल्यानंतर विजयबाबू आपल्यावर बळजबरी करायचा. नशेचं औषध देत किंवा मद्य पाजून आपल्यावर बलात्कार करायचा. एक ते दीड महिने त्याने माझे असे शारीरिक व मानसिक शोषण केले. तसेच याबद्दल वाच्यता केल्यास प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करून बरबाद करण्याची त्यांनी धमकी दिली, असे त्या महिलेने सांगितले. या महिलेने वुमन अगेन्स्ट सेक्शुअल हरॅसमेंट नावाच्या फेसबुक ग्रुपवर ही पोस्ट केली आहे. यात तिने कथित लैंगिक अत्याचाराच्या तपशिलांचे वर्णन केले आहे. सदर घटनेनंतर विजयबाबू फरार होते.

परंतु सदर केसच्या संदर्भात विजयबाबूची चौकशी करायची असल्याने केरळ पोलिसांनी त्यास हजर राहण्यास सांगितल्यावरून कालच तो दुबईहून परतला आहे.

दरम्याने जेव्हा या महिलेने त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते तेव्हा दुसऱ्या दिवशी फेसबुकवर लाइव्ह येत विजयबाबूने साळसूदपणाचा आव आणत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. शिवाय मी काहीही चुकीचे केलेले नाही. उलट मीच पीडित आहे. मी मानहानीचा खटला दाखल करेन. मी तिला इतक्या सहजासहजी सुटू देणार नाही, असा इशाराही त्याने दिला आहे. एकदंरच सर्व परिस्थिती पाहता पीडितेलाही वाटतंय की काहीही झालं तरी तिलाच न्याय मिळणार आणि दुसरीकडे विजयबाबू आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर आपल्याला शिक्षा होणारच नाही, अशा आवेशात आहे. विजय कोणाचा होईल… ?