महेश कोठारे यांचे आत्मचरित्र प्रकाशित: डॅम इट आ...

महेश कोठारे यांचे आत्मचरित्र प्रकाशित: डॅम इट आणि बरंच काही (Actor- Producer- Director Mahesh Kothare’s Autobiography “Damn It ” is ready to Publish)

मराठी इंडस्ट्रीला सोन्याचे दिवस दाखवणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता महेश कोठारे यांचे नाव आघाडीवर आहे. महेश कोठारे यांनी बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती. आज ते एक यशस्वी निर्माता दिग्दर्शक झाले आहेत. 80- 90 च्या दशकात त्यांनी एकाहून एक कलाकृती मोठ्या पडद्यावर सादर केल्या होत्या. दिग्दर्शनात पाऊल ठेवल्यावर त्यांनी दिग्गज अभिनेता लक्ष्मिकांत बर्डेला आपल्या चित्रपटाचा नायक बनवले. इतक्या वर्षांचा फिल्म इंडस्ट्रीचा अनुभव असणाऱ्या महेश कोठारेंनी आपले आत्मचरित्र प्रकाशित केले आहे.

डॅम इट आणि बरंच काही असे महेश कोठारे यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे. या आत्मचरित्रात वाचकांना महेश कोठारे यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही माहिती वाचायला मिळणार आहे. आयुष्याच्या प्रवासात कौटुंबिय जबाबदारी, अनेक मानअपमान सोसणारे चटके, मराठी चित्रपट सृष्टीचा पडता काळ, चित्रपट निर्मितीमधून मिळालेले अनपेक्षित वळण, सहा दशकात संपर्कात आलेले कलाकार, एवढेच नाही तर लाडक्या लक्ष्यासोबतच्या गोड आठवणींना दिलेला उजाळा पाहायला मिळणार आहे.

येत्या 11 जानेवारीला हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. या पुस्तकाची प्रीबुकिंग सुरु झाली आहे. पुस्तकाबद्दल महेश कोठारे म्हणाले की, एक अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, लेखक या नात्याने माझ्या जीवन प्रवासाचा लिखित पट तुमच्यासमोर आणताना मला खूप आनंद होतोय.

पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे एक मुलगा, एक पती, एक पिता आणि एक विश्वासू या नात्याने एक कुटुंब म्हणून जेव्हा आपण एकत्र उभे राहू शकतो, तेव्हा अडथळ्यात आलेल्या पर्वतालाही हलविण्याचे सामर्थ्य तुमच्यात येते. मी तुमच्यासमोर माझा हा सर्व प्रवास मांडत आहे माझ्या आत्मचरित्रातून डॅम इट आणि बरंच काही.