अभिनेता कार्तिक आर्यनने केला कॅन्सरवर मात केलेल...

अभिनेता कार्तिक आर्यनने केला कॅन्सरवर मात केलेल्या हिंमतबाज लोकांचा गौरव (Actor Kartik Aryan Honours Cancer Survivors For Their Successful Battle Against The Disease)

मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलने ‘निडर हमेशा’ या कॅन्सर बाबत जागृती करण्याच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत कॅन्सर प्रतिबंधक केंद्र सुरू केले. तसेच नानावटी मॅक्स साथी असा कॅन्सर योद्ध्यांचा सपोर्ट ग्रुप स्थापन करून त्यामधील कॅन्सरवर मात केलेल्या १५ लोकांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास ‘सोनूज्‌ टिटू ॲन्ड टिटूज्‌ स्वीटी’, ते ‘गेस्ट इन लंडन’ व ‘शहजादा’ अशा अनेक यशस्वी चित्रपटांचा तरुण अभिनेता कार्तिक आर्यन आवर्जून उपस्थित होता.

कार्तिक आर्यनच्या हस्ते मानचिन्ह देऊन कॅन्सरवर मात करून सुखाचे जीवन जगणाऱ्या १५ माजी रुग्णांचा गौरव करण्यात आला. या रुग्णांमध्ये डॉक्टर, गायक, नर्तक, समाजसेवक असे लोक आहेत.

या प्रसंगी नानावटी मॅक्स इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर केअरचे वरीष्ठ संचालक डॉ. हेमंत टोणगांवकर, सिनियर व्हाईस प्रेसिडेन्ट मंगला डेम्बी व इतर मान्यवर डॉक्टर्स उपस्थित होते.

‘मला या कार्यक्रमात सहभागी केल्याने मी उपकृत झालो आहे. माझ्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. उपचारांनी ती पूर्ण बरी झाली तरी या भयंकर रोगाची संक्रमण अवस्था मी बघितली आहे. मला आईचा अभिमान वाटतो. या केंद्रातील डॉक्टर्स कॅन्सरग्रस्तांवर निव्वळ औषधोपचार करत नसून त्यांचं मनोबल वाढवतात. पूर्वीसारखा आता हा रोग भय वाटणारा राहिलेला नाही. तरी प्रत्येक माणसाने विशिष्ट वयानंतर हेल्थ चेकअप करून घ्यावे,’ असा सल्ला कार्तिकने दिला.