ड्रग्ज प्रकरणात अभिनेता दलीप ताहिलचा तरुण मुलगा...

ड्रग्ज प्रकरणात अभिनेता दलीप ताहिलचा तरुण मुलगा ध्रुव अटकेत (Actor Dalip Tahil’s Son Dhruv Arrested In Durgs Case)

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध चरित्र अभिनेता दलीप ताहिल यांचा तरुण मुलगा ध्रुव, याला अंमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर बंदी असलेल्या अंमली पदार्थांचा चोरटा क्रयविक्रय करण्याचा आरोप लावण्यात आला आहे.

दलीप ताहिल हे हिंदी सिनेमातील नावाजलेले कलाकार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपला मुलगा ध्रुव ताहिलचा फोटो शेअर करून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले होते. ‘मेरा बेटा ध्रुव उभरता हुआ एक्टर’ असे त्यांनी सदर पोस्टमध्ये लिहिले होते.

पण या पदार्पणाआधीच ध्रुव वर ड्रग्जचे क्रयविक्रय करण्याचे आरोप लागले आहेत. अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या एका चोरट्याशी ध्रुवने केलेल्या व्हॉट्‌स ॲप चॅटवरून तो कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. ड्रग्जची खरेदी व विक्री करण्यासाठी मुजम्मिल अब्दुल रहमान शेख या आरोपीच्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर केल्याचा आरोप ध्रुववर लावण्यात आला आहे.

सांगायची गोष्ट म्हणजे सदर मुजम्मिल अब्दुल रहमान शेख या अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्याला आधी अटक करण्यात आली. त्याचा फोन धुंडाळत असताना पोलिसांच्या नजरेस आलं की, ध्रुव ताहिलने ड्रग्जची देवाणघेवाण करण्यासाठी त्याच्याशी व्हॉटस्‌ ॲपवर चॅट केले आहे. त्यावरून ॲन्टी नार्कोटिक्स सेलने ध्रुव ताहिलला ताब्यात घेतले. चौकशीतून असं उघडकीस आलं की ध्रुव ताहिल २०१९ सालापासून या शेखच्या संपर्कात होता आणि त्याने शेखच्या बँक खात्यावर किमान ६ वेळा पैसे ट्रान्सफर केले आहेत. आता या प्रकरणाची कसून तपासणी सुरू आहे.

ध्रुवच्या करिअर बाबत बोलायचं झालं तर तो लवकरच अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार होता. याची माहिती, स्वतः त्याचे पितीजी दलीप ताहिल यांनी इन्स्टाग्राम वर दिली होती. त्याच्या फोटोसह त्यांनी ही माहिती दिली. तेव्हा कित्येक मान्यवरांनी ध्रुवला शुभेच्छा दिल्या होत्या.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा वापर आणि चोरटा व्यापार होत असल्याचे उघडकीस आले. तेव्हापासून एनसीबी बॉलिवूडच्या कलाकारांवर बारीक लक्ष ठेवून एकापाठोपाठ एक प्रकरणे उघडकीस आणत आहेत. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमध्ये झालेला ड्रग्जचा शिरकाव पाहता स्वतः दलीप ताहिलने, आम्हाल कलाकारांना अडचणीत आणले आहे, असे निवेदन दिले होते. फक्त बॉलिवूडकडे बोट दाखवू नका. एका नटाच्या मृत्यूनंतर, त्याला न्याय देण्यासाठी जी कारवाई चालू आहे, त्याचे सर्कशीत रुपांतर झाले आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. पण आता आपल्या मुलाला अशा प्रकरणात अटक झाल्यानंतर ते मूग गिळून बसले आहेत. कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला आहे.