काशी इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्र...

काशी इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी सादर केला शानदार डान्स परफॉर्मन्स (Actor And BJP MP Hema Malini Performed At Kashi Film Festival In Varanasi)

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणाऱ्या बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांची लोकप्रियता आजही कायम आहे. नुकतंच हेमा मालिनी यांनी एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्धाटन सभारंभाला हजेरी लावली. त्यावेळी त्यांचा गौरवही करण्यात आला. या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेल्या डान्स परफॉर्मन्सचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये तीन दिवसीय काशी इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल सोमवारी सुरु झाला आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शास्त्रीय नृत्य आणि संगीताचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. याच डान्स महोत्सवादरम्यान हेमा मालिनी यांच्या नृत्यामुळे त्यांनी सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

एएनआय उत्तरप्रदेश या ट्वीटर अकाऊंटवरुन हेमा मालिनी यांच्या नृत्याचा हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. यात ड्रीम गर्ल यांच्या नृत्याची खास झलक पाहायला मिळत आहे. यात त्यांचे नृत्य पाहून प्रेक्षक घायाळ झाले आहे. यावेळी त्यांनी जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. दरम्यान केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी हेमा मालिनी यांच्या डान्स परफॉर्मन्सवर प्रतिक्रिया दिली. “अनेकजण हेमा मालिनी यांना ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखतात. पण आतापासून त्यांना ‘दुर्गा’ म्हणून ओळखले पाहिजे,” असे ते म्हणाले.

हेमा मालिनी यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर या कार्यक्रमातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोद्वारे त्यांनी आपल्या चाहत्यांना काशी इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलची झलक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी याला ‘सुपर सक्सेस’ असे कॅप्शन दिले आहे.

हे फोटो शेअर करताना त्या म्हणाल्या, “कोरोनानंतर दीर्घकाळ थांबल्यानंतर आम्ही वारणसीच्या सुंदर सभागृहात दुर्गा नृत्य सादर केले. महिषासुराचा सामना करण्याची तयारी करताना दुर्गा देवीच्या रचनेची काही छायाचित्रे”, असे त्यांनी म्हटले आहे.

मागच्याच महिन्यात पार पडलेल्या ५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवामध्ये हेमा मालिनी यांना भारतीय चित्रपटांतील त्यांच्या योगदानासाठी साल २०२१ चा ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द ईयर’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पीआयबी इंडियाने याबाबतचे ट्वीट प्रदर्शित केले होते.