पत्नीच्या कृतीचे आभार माना… (Acknowledge ...

पत्नीच्या कृतीचे आभार माना… (Acknowledge Your Wife’s Sexual Act )

आमच्या लग्नाला एकच वर्ष झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून माझ्या पतीचे शीघ्रपतन होत आहे. सेक्स करताना त्यांचा कारभार लवकर आटोपतो. माझे तसे होत नाही. त्यामुळे मला समाधान मिळत नाही. कधी कधी त्यांनाही अपराधी वाटते. पण कधी कधी ते चिडतात. हे असंच असतं, असं म्हणतात. मला हे पटत नाही. यावर काही इलाज आहे का? औषधं
आहेत का?

  • रजनी, नागपूर
    काही पुरुषांमध्ये ही समस्या असते. त्यामुळे तुमचे समाधान होत नसले तरी, तुमच्या पतीला समजून घ्या. यावर औषधे फार प्रभावी ठरू शकणार नाहीत. औषधांच्या नावाखाली काही भोंदू वैदू तुमची फसवणूक करतील. पैसे खर्च होतील. शीघ्रपतन ही मानसोपचाराने बरी होणारी समस्या आहे. तेव्हा आपण चांगले मानसोपचार तज्ज्ञ अथवा संमोहन उपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या पतीची समस्या दूर होईल.

माझे पती कामावरून उशिरा घरी येतात व दमल्यामुळे लवकर झोपतात. सकाळी त्यांना लवकर जाग येते आणि ते पहाटेच्या वेळी शरीरसुख घेऊ इच्छितात. पण माझी तयारी नसते. कारण तेव्हा मला गाढ झोप लागली असते. रात्री जे काम करायचं, ते पहाटेस करायला मागतात. त्यांच्या मते झोप झाल्याने सकाळी आपण ताजेतवाने असतो. पण माझ्या डोळ्यात झोप असते. म्हणून मी नाही म्हणते. पण या मुद्यावरून आमची भांडणे होतात. आता मी काय करू?

  • सविता, ठाणे.
    तुम्हा दोघांच्या रात्री झोपण्याच्या व सकाळी उठण्याच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने हा पेचप्रसंग उभा राहिलेला दिसतो आहे. मात्र सेक्स रात्री करावा, याबाबत तुमचा गैरसमज आधी दूर करा. सेक्स हा पती-पत्नी यांनी आपल्या सोयीने करायला हवा. त्याला काळवेळाचे बंधन नसावे. रात्रीपेक्षा पहाटेस केलेली ही क्रीडा नक्कीच चांगली होऊ शकते. त्यानुसार तुमची मानसिक तयारी करून घ्या व हे सुख उपभोगा. याचा अर्थ पतीची मर्जी राखलीच पाहिजे, असा करून घेऊ नका. ही देवाण-घेवाण आहे. ती दोघांच्याही संमतीने झाली पाहिजे.

माझे वय 50 वर्षे आहे. माझ्या बायकोचे 45 वर्षांचे आहे. आमचे कामजीवन तसे सुखाचे चालले आहे. पण अलीकडे माझी बायको जरा विचित्र वागते. सेक्स करण्यापूर्वी ती हस्तमैथुन करते. नंतर मला करू देते. हे मला पटत नाही. तिच्यामध्ये काही विकृती निर्माण तर झाली नाही ना, अशी मला शंका येते आहे. करू नकोस, सांगितलं तर ऐकत नाही. हे वागणं योग्य आहे का? यावर काही इलाज आहे का?

  • अनिल, बारामती.
    सर्वप्रथम हस्तमैथुन करणे हे गैर आहे, ही समजूत तुमच्या मनातून काढून टाका. ते नैसर्गिक आहे. तुमच्या बायकोचे वय पाहता, कदाचित असं घडलं असेल की, त्यांच्यात उत्तेजना येत नसेल, किंवा उशिराने येत असेल. म्हणून त्या स्वतःला उत्तेजित करून घेण्यासाठी किंवा समागमासाठी तयार करण्यासाठी हस्तमैथुन करीत असतील. ही तुमच्यासाठी व त्यांच्यासाठी चांगलीच बाब आहे. त्यामुळे ही विकृती आहे, असं समजण्याचं कारण नाही. त्या स्वतःच्या समाधानासाठी व तुम्हाला समागमात नीट रममाण होता यावं म्हणून करतात, असं समजून त्यांचे आभार माना.