पहिली मराठी स्त्री -गझलकार (Achievement of Poet...

पहिली मराठी स्त्री -गझलकार (Achievement of Poetess As the First Marathi Female Ghazal Writer)

महाराष्ट्रातील पहिल्या मुशायर्‍यातील पहिल्या स्त्री गझलकार ज्योती बालिगा-राव. थेट अंतःकरणाचा ठाव घेणारी सहजसुंदर रचना हे ज्योती बालिगांच्या गझलचे वैशिष्ट्य. आयुष्यातील कैफियत, वेदना मांडताना ही गझलकारा सहजतेने व्यक्त होते. सतत बडबड करणारी, गाण्यात-नाचात रमणारी मुलगी पुढे जाऊन उच्च प्रतीची गझलकारा बनेल असे कोणाच्या ध्यानीमनीही नसताना केवळ गझलकाराच नव्हे तर जादूचे प्रयोग, टॅरो रिडिंग, ज्योतिष अभ्यास, अभिनय, कॅरम आणि रेकी अशा विविध क्षेत्रात ज्योती बालिगांनी आपली मोहोर उमटवली आहे.
पदरात या निखारे बांधून मी निघाले
सुकुमार चंद्र मागे सोडून मी निघाले
आजन्म कोंडलेला हृदयात सूर होता
माझाच कंठ आता कापून मी निघाले
हे आर्जवी शब्द आहेत महाराष्ट्रातील पहिल्या मुशायर्‍यातील पहिल्या स्त्री गझलकार ज्योती बालिगा-राव यांचे! साधारणतः 1982च्या सुमारास म.सा.प.च्या वतीने पुण्यात ‘गझलसंध्या’ हा कार्यक्रम संपन्न झाला. गझलसम्राट सुरेश भटांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेला महाराष्ट्रातला हा पहिलाच मुशायरा! या मुशायर्‍यात रमण शहा, अनिल कांबळे, सुरेशचंद्र नाडकर्णी, रमण रणदिवे या तरुण आघाडीच्या गझलकारांसोबत व्यासपीठावर एकमेव महिला गझलकार होत्या, त्या म्हणजे विरारच्या ज्योती बालिगा-राव!

थेट अंतःकरणाचा ठाव घेणारी सहजसुंदर रचना हे ज्योती बालिगांच्या गझलचे वैशिष्ट्य. आयुष्यातील कैफियत, वेदना मांडताना ही गझलकारा सहजतेेने व्यक्त होते –
तू दिलेल्या यातनांचे मी जरी काहूर होते
जीवना रे सांग केव्हा मी तुला मंजूर होते
अभिव्यक्तीतील सहजसुंदरता हा बालिगांच्या गझलेचा आत्मा!
प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असणार्‍या ज्योती बालिगांची गझल जवळपास 40 वर्षे सातत्याने विविध मुशायर्‍यांमधून, रसिक श्रोत्यांची दाद मिळवत आहे.
प्रा. सुरेशचंद्र नाडकर्णींची प्रस्तावना लाभलेले ’भाव माझ्या अंतरीचे’ हे ज्योती बालिगांचे पुस्तक म्हणजे तर ’इस दिल की बात उस दिल तक’ असा सहजसुंदर काव्यात्म आविष्कार!  त्यांच्या कितीतरी गझल स्वरबद्धही झालेल्या आहेत. त्यापैकी यशवंत देवांनी स्वरसाज चढवलेली व अरुण दातेंनी गायलेली ज्योती बालिगांची –
‘एकदा हास तू, हसत माझा मला परत दे श्‍वास तू’ ही गझल आजही रसिकांच्या मनात रेंगाळत आहे.
कलंदर व्यक्तिमत्त्व
आज ज्योती बालिगांची ओळख ज्येष्ठ गझलकार म्हणून असली तरी ही कवयित्री म्हणजे एक कलंदर, हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व!  ज्योती बालिगा मूळच्या कर्नाटकच्या असल्या तरी त्यांचा जन्म आणि संपूर्ण बालपण मुंबई नजीकच्या विरारमध्येच गेलं. अभिनेता गोविंदाची शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या विरारमधील विद्या मंदिर या शाळेत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर मशाळेतली दंगा करणारी मुलगीफ म्हणून त्या शाळेत प्रसिद्ध होत्या. अशी ही सतत बडबड करणारी, गाण्यात-नाचात रमणारी मुलगी पुढे जाऊन उच्च प्रतीची गझलकारा बनेल असे तेव्हा कोणाच्या ध्यानीमनीही नसेल. तेव्हा अंगातल्या या सळसळत्या उत्साहामुळेच त्या रमल्या ‘हुलाहप’ या रिंगच्या खेळात. रिंग बोटावरून मानेवर, कमरेवर, पायावर आणि उलट बोटापर्यंत फिरवण्याचे कसब ज्योतीताईंनी आत्मसात केले होते. या खेळात त्या एवढ्या पारंगत झाल्या की पुढे जाऊन त्यांनी त्याचे स्टेज शो ही केले. जादूचे प्रयोग, टॅरो रिडिंग, ज्योतिष अभ्यास, अभिनय, कॅरम आणि रेकी अशा विविध क्षेत्रात ज्योती बालिगांनी आपली मोहोर उमटवली. मास्टर दत्तारामांचा मुलगा म्हणजेच नाना वळवईरांच्या नाटकात काम करून राज्य नाट्यस्पर्धेत ज्योतीताईंनी अभिनयाचे पहिले पारितोषिकही पटकावले. विविध क्षेत्रात लीलया संचार करणार्‍या या मनस्वी मुलीला मात्र घरच्या परिस्थितीमुळे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याआधीच सिंडिकेट बँकेत नोकरी पत्करावी लागली. दरम्यानच्या काळात आनंद नाडकर्णींच्या एका एकांकितेत काम करताना त्यांची रत्नाकर राव यांच्याशी मैत्री झाली आणि लवकरच या मैत्रीचे रुपांतर विवाहात झाले. काहीसा अबोल पण समंजस जोडीदार ज्योती बालिगांना लाभला नि त्यांचा संसार बहरु लागला. बँकेतील नोकरी दोन्ही मुलींचे पालनपोषण नि कौटुंबिक जबाबदार्‍या या सगळ्या प्रपंचात त्या व्यस्त झाल्या.

या सगळ्या प्रवासात खर्‍या अर्थाने ज्योतीताईंचे साहित्याशी सूत जोडले गेले ते नालासोपार्‍याचे डॉ. वसंत अवसरे यांच्यामुळे! साहित्यप्रेमी अवसरे यांच्या बंगल्यात साहित्यिकांचा सतत राबता असायचा. उपचारांसाठी डॉक्टरांकडे गेलेल्या ज्योतीताईंना तिथेच खरं तर साहित्याची गुटी मिळाली असे म्हणता येईल. तिथल्या साहित्यिक मैफिलींमध्ये त्या रमू लागल्या नि तिथेच त्यांची ओळख झाली ती कै. आनंद साधले या थोर साहित्यिकाशी!

कवयित्री उमलू लागली
आनंद साधलेंनी पितृत्त्वाच्या नात्याने दटावणीच्या सुरात पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा दिलेला सल्ला आदेश मानून माधव मनोहरांच्या मार्गदर्शनाखाली ज्योतीताईंनी बी.ए. मराठी केलं आणि पुढे जाऊन एम. ए. ही केलं. कळत-नकळत घडलेल्या या साहित्य संस्कारांतून ज्योती बालिगा ही कवयित्री उमलू लागली.
सिंडिकेट बँकेत काम करता-करता फावल्या वेळेत बँकेतील स्लीपच्या मागच्या बाजूला त्या आपली कविता लिहू लागल्या. आपल्याला कविता जमली न् जमली अशा विचाराने त्या कविता लिहिलेल्या स्लीप्स बोळा करून फेकून द्यायच्या. त्यांनी बोळा करून फेकून दिलेले कागद त्यांचे सहकर्मचारी गुलाब पवार गोळा करायचे. असा गोळा केलेल्या कवितांच्या कागदांचा त्यांनी बंच तयार केला नि तो ज्योतिताईंना सुपूर्द केला. आपण लिहिलेल्या या कवितांचं नेमकं करायचं काय? हा प्रश्‍न त्यांच्या मनात रेंगाळत होता आणि अखेर या प्रश्‍नाचे उत्तर त्यांना सापडले, मालतीताई बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मुंबईतील मराठी साहित्य संमेलनात. या संमलेनात त्यांनी आपलं लिखाण कवी सुरेश भट यांना वाचायला दिले. सुरेश भटांनी त्यांच्या कविता चाळल्या नि म्हणाले, “बरं लिहिताय, पण ही गझल नाही. ही गझलसदृश रचना आहे.“ त्यांनी ज्योतीताईंचा पत्ता नमूद करून घेतला. नि आठवड्याच्या आतच भटांचे त्यांना पत्र आले. पत्रात होती गझलेची बाराखडी. इथूनच कवी सुरेश भटांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती ताईंचा गझल शिकता शिकता गझल लिहिण्याचा प्रवास सुरू झाला नि त्यांची पहिलीवहिली गझल शब्दबद्ध झाली.
तू ओळखून घे जे, माझ्या मनात आहे
ओठांस टाळणारी, मी तीच बात आहे
ज्योतीताईंच्या गझलेचे शब्द हृदयाला इतके भिडतात की ते कायमच आपल्या मनात घर करून राहतात. याचा सुखद प्रत्यय त्यांनाही आला तो कवी ग्रेस यांच्याशी झालेल्या भेटीत. कवी सुरेश भटांनी कवि ग्रेस यांच्याशी ज्योती बालिगांची ओळख करून दिली. नाव ऐकताच कवी ग्रेस यांनी डोळे बंद केले आणि त्यांच्या मुखातून ज्योती बालिगांच्या गझलचे शब्द आले –
हे शब्दही न माझे, ही ओळही न माझी
ही वेदनाच माझी टाकीत कात आहे
असाच एक ज्योती बालिगांच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग आहे. कवी सुरेश भट आणि कवि मंगेश पाडगावकर या दिग्गजांबरोबरचा! एका कार्यक्रमात ज्योती बालिगा या ज्येष्ठ मान्यवरांसोबत व्यासपीठावर होत्या. हे दोन्ही कवी म्हणजे मैफिलीचे बादशहाच! पाडगावकरांनी आपल्या दिलखेच शैलीत कविता सादर केली. त्याचे शब्द काहीसे असे आहेत –
डोळ्यांवरून माझ्या उतरून रात्र गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली
पाडगावकरांच्या या कवितेला प्रतिसाद देताना- ज्योती बालिगा उत्स्फुर्तपणे व्यासपीठावरून आत्मविश्‍वासाने म्हणाल्या –
गात्रातल्या फुलांना पखरून रात्र गेली
अन् चांदणे उशाला विसरून रात्र गेली
चळली जरा जराशी माझी स्मशान माती
एकेक आठवाला उकरून रात्र गेली
या काव्यपंक्ती ऐकून भारावलेल्या मनःस्थितीतच पाडगावकर खुर्चीतून उठून उभे राहिले आणि टाळ्या वाजवून त्यांनी ज्योतीताईंच्या प्रतिभेला एकप्रकारे मानवंदनाच दिली. इतक्या वर्षांनी आजही हा अनुभव ज्योतीताईंच्या तोंडून ऐकताना प्रसिद्धीपराङ्मुख असणार्‍या या कवयित्रीच्या चेहर्‍यावर आपल्या साहित्यसाधनेला मान्यवरांकडून, रसिकांकडून मिळालेल्या पोचपावतीचे समाधान तरळत होते.

चमत्कृतीपूर्ण सौंदर्यस्थळे
ज्योती बालिगांची गझल ऐकताना रसिक आपसूकच वाह! वाह! ची दाद देत असतो. अशी विलक्षण अनुभूती व्यक्त करणारी चमत्कृतीपूर्ण सौंदर्यस्थळे आपल्याला त्यांच्या गझलमध्ये ठायी-ठायी सापडतात. जसे त्यांची – ‘तरही गझल’ या प्रकारातली गझल वाचली नि तोंडून सहजच शब्द आले मवाह! क्या बात है!फ या गझलमधील काही शेर आवर्जून उद्धृत करावेसे वाटतात-
गर्दीत माणसांच्या माणूस सापडेना
ही जात धर्म रुढी सारेच ठोकरूया
होईल आर्त जेव्हा हा सूर अंतरीचा
ये स्वागतास त्याच्या काळीज अंथरुया
निःशब्द भावनांच्या शब्दास गंध येतो
गंधाळल्या मिठीने चल आज मोहरुया
’गझल‘ हा साहित्यप्रकार तसा तंत्रशुद्धतेच्या कसोटीवर तावूनसुलाखूनच आविष्कार होणारा. गझल ही काफिया, मतला, रदीफ यांचे पालन करून केलेली बांधील रचना असते. पण ती बांधील न वाटता, कृत्रिम न राहता, जेव्हा सहजसुंदर लहेजा घेऊन व्यक्त होते, तेव्हाच रसिकांची वाह! वाह! मिळवून जाते.
या कसोटीवर ज्योती बालिगा-राव यांची गझल निश्‍चितच रसिकांच्या थेट हृदयालाच भिडते. कवयित्रीचे शब्दच एक अंतर्गत लय घेऊन येतात. या गझलकारेला हे सहजतेने कसे जमते? याची खूणगाठ मला ज्योतीताईंच्या ’हुलाहप‘ या खेळात सापडते. हा रिंगचा खेळ करताना, रिंग खाली पडू न देता गाण्याच्या तालावर ही रिंग डौलदारपणे घुमवताना ज्योतीताईंच्या केसांच्या टोकापासून पायाच्या नखांपर्यंत एक अंतर्गत लयच जणू संचारायची. हे कसबच जणू या गझलकारेच्या शरीरातच भिनलं होतं नि तेच त्यांच्या गझलेतही कळत-नकळतपणे उतरलं.
तंत्राच्या साच्यात चपखलपणे गझल बसवताना शब्द नि अर्थाचा डौल सांभाळून ज्योती बालिगांची गझल पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत एका अंतर्गत लयीत सहजतेने अभिव्यक्त होते आणि म्हणूनच रसिक-श्रोत्यांच्या काळजालाच हात घालते. कविवर्य मंगेश पाडगावकर आपल्या एका कवितेत म्हणतात –
कोर्‍या कोर्‍या कागदावर असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं
गझल ही पुस्तकातून छापून आली तरी गझल या काव्यप्रकाराची खरी पूर्तता होत असते ती मुशायर्‍यात!  ही गझल जेव्हा गझलकाराच्या तोंडून एका विशिष्ट शैलीत रसिकापर्यंत पोहोचते तेव्हाच या गझलेला खर्‍या अर्थाने पूर्णत्व लाभते.

सुमारे 40 वर्षांपासून ते आजतागायत आपली गझल दिलखुलासपणे मुशायर्‍यांमधून, कवीसंमेलनांतून सादर करणारी ज्योती बालिगा-राव ही केवळ गझलकाराच नाही तर उत्तम ’परफॉर्मर‘ही आहे. लवकरच वयाची सत्तरी गाठणारी ही कार्यमग्न कवयित्री आजही स्वस्थ बसत नाही. ज्योतिष विद्येचा अभ्यास असणार्‍या ज्योती बालिगा सखोलपणे पत्रिकांचा अभ्यास करून लोकांना मार्गदर्शन करत असतात. तसेच रेकीमध्ये ग्रँडमास्टर असणार्‍या ज्योती ताई कितीतरी रुग्णांना व्याधीमुक्त करण्यासाठी रेकी उपचार देत असतात.
त्यांचा हा गझलप्रवास नि साधना अशीच अखंड राहो या शुभेच्छा देताना त्यांच्याच गझलेच्या दोन ओळी गुणगुणाव्याशा वाटतात –
अजून मैफिलीत मी
तुझेच गीत छेडते
तुझेच शब्द घेऊनि
तुला स्वरात माळते
-अश्‍विनी शिंदे-भोईर (अ‍ॅश फिचर एजन्सी)