आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’...

आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ नाटकाला ६० वर्षे झाली : शासनातर्फे साजरा होतोय् हिरक महोत्सव (Acharya Atre’s Famous Play ‘Toh Mee Navhech’ Enters Into 60th Year Of Performance : Maharashtra Government Celebretes Its Diamond Jubilee Today)

नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांनी आपल्या पंचरंगी भूमिकेने अजरामर केलेले ‘तो मी नव्हेच’ ह्या नाटकाला ६० वर्षे झाली आहेत. साहित्यसम्राट आचार्य अत्रे लिखित या नाटकाची लोकप्रियता अजूनही टिकून आहे. या नाटकाचा हिरक महोत्सव आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपन्न होत आहे.

मराठी रंगभूमीवरील अतीव लोकप्रिय असलेल्या या नाटकाने मोठा इतिहास घडवला आहे. महाराष्ट्र व इतर प्रांतातही, गावोगावी प्रयोग होणारे हे एकमेव नाटक आहे. या नाटकास इतकी मागणी होती की, पणशीकरांनी त्याचे प्रयोग अगदी लहानसहान गावात, रंगमंच उभारून केले आहेत.

‘तो मी नव्हेच’ या नाटकाचे अडीच हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. १९६२ साली, याच ऑक्टोबर महिन्यात या नाटकाचा शुभारंभ झाला. नाट्य निकेतन या संस्थेतर्फे ते सादर झाले. त्याचे दिग्दर्शक मो. ग. रांगणेकर होते. दोन-तीन वर्षानंतर रांगणेकर आणि आचार्य अत्रे यांच्यात वाद झाला व हे नाटक थोड्या वेळासाठी बंद झाले. तेव्हा अत्र्यांनी ते चालू केले. आत्माराम भेंडे यांनी त्यावेळी प्रमुख भूमिका केली होती.

यानंतर खुद्द प्रभाकर पणशीकर यांनी आपल्या नाट्यसंपदा या संस्थेतर्फे हे नाटक निर्माण केले. त्यांच्या लखोबा लोखंडेच्या हातखंडा भूमिकेने इतिहास निर्माण केला व हे नाटक धो धो चालले. हजारोंच्या संख्येने या नाटकाचे प्रयोग करून प्रभाकर पणशीकर यांना कधीच कंटाळा आला नाही. उलट ‘मी प्रत्येक प्रयोगात नित्य नवे काही करत असतो,’ असे सांगून त्यांनी आपल्यातील कलाकाराच्या सृजनशीलतेची ग्वाही दिलेली आहे.

आचार्य अत्रे यांनी त्या काळी गाजलेल्या काझी खटल्यावर आधारित हे नाटक लिहिले आहे. एक डोकेबाज माणूस अनेक मुलींशी लग्न करून त्यांना फसवतो, लुबाडतो. अन्‌ अटक होऊन त्याच्यावर खटला भरण्यात येतो, तेव्हा आपल्यावरील आरोपाचे खंडन करून ‘तो मी नव्हेच’ असे निर्लज्जपणे सांगतो. सदर नाटकात जास्त पात्रे असल्याने ती काम करणारे अनेक नट बदलले. परंतु पणशीकर लखोबा लोखंडेच्या भूमिकेत कायम राहिले.

आज या नाटकाच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने राज्यशासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने सादर केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात लखोबाची प्रमुख भूमिका डॉ. गिरीश ओक हे करणार असून विशाखा सुभेदार, सागर कारंडे, विघ्नेश जोशी, दिनेश कोडे इत्यादी नामवंत कलाकार यात सहभागी होणार आहेत.